For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दावे स्थानिक पातळीवर...वरीष्ठ नेते निर्णय घेतील! विधानसभा जागावाटपबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती

04:51 PM Sep 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
दावे स्थानिक पातळीवर   वरीष्ठ नेते निर्णय घेतील  विधानसभा जागावाटपबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती
MP Shrikant Shinde
Advertisement

कोल्हापूरात महायुतीला चांगले वातावरण; जनसंवाद यात्रेतून जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांचा घेतला आढावा

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील पक्षांकडून विधानसभा मतदार संघांवर केले जात असलेले दावे हे स्थानिक पातळीवर सुरु आहेत. त्यामुळे सध्या होत असलेल्या दाव्यांमध्ये तथ्य नाही. मात्र कोणता पक्ष कोणती जागा किती वर्ष लढवत आहे. तेथील आजी-माजी आमदारांसह इच्छुकांचे जनमत काय आहे, याबाबतची सविस्तर माहिती घेवून जागा वाटप संदर्भातील निर्णय महायुतीचे वरीष्ठ नेते घेतील, अशी स्पष्टोक्ती खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

खासदार शिंदे म्हणाले, जनसंवाद यात्रेतून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचत त्यांच्याशी संवाद साधत त्यांचे मत जाणून घेतले आहे. यामधून प्रत्येक विधानसभा मतदार संघात उमेदवार कोण आहे. त्यांचे मतदार संघात जनमत कसे आहे, पक्ष संघटन कशा प्रकारे आहे, याबाबतच ग्राऊंड रिपोर्ट तयार करुन हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीवर टिका करताना ते म्हणाले, लाडकी बहिण योजनेचा महाविकास आघाडीने धसका घेतला आहे. सुरवातीच्या काळात त्यांनी हि योजना राबवली जाणार नाही, एकच हप्ता मिळेल पुढे पैसे मिळणार नाहीत असे योजनेबाबत महिलांमध्ये गैरसमज पसरवले. पण महिलांच्या खात्यावर आता दोन हप्ते जमा झाले आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासत महायुती सरकारने अनेक जनकल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे जनतेमधून महायुतीला मिळणारा प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळु सरकरली आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही महाविकास आघाडीकडुन खोटा प्रचार सुरु आहे. मात्र आता जनतेला महाविकास आघाडीचा खरा चेहरा समजला आहे. त्यामुळे विधानसभेला महायुती सरकारला चांगले यश मिळेल असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला.

Advertisement

पत्रकार परिषदेला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार राहूल शेवाळे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके, युवासेना सचिव पुर्वेश सरनाईक, भाऊ चौगुले आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.