लोकसभेप्रमाणे खोट्या प्रचाराची शक्यता, गाफील राहू नका ! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सूचना
विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन; जनसंवाद यात्रेतंर्गत जैन बोर्डिंग येथे शिवसैनिकांशी संवाद
कोल्हापूर प्रतिनिधी
लोकसभेचा पूर्वानुभव पाहता विरोधकांकडून विधानसभा निवडणुकीतही खोटा अपप्रचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील न राहता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना शिवसेना संसदीय नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिकांना केली. तसेच महायुतीने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शिवसेनेचे काम घरोघरी पोहचवा असेही आवाहन केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी सुरु केलेली जनसंवाद यात्रा मंगळवारी कोल्हापुरात आली. यात्रेतंर्गत खासदार शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात आढावा बैठका घेत शिवसैनिकांची मते जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली आहे. त्याची धास्ती विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे खोटा अपप्रचार करण्याचा डाव या विधानसभा निवडणूकित विरोधकांकडून केला जाऊ शकतो. त्यामुळे गाफिल न राहता शासनाच्या योजनाच्या माध्यमातून घरोघरी पोहचा. जनसंवाद द्रौयामध्ये महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्या लाभार्थी महिलांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. शिवसैनिकांसह खासकरून महिला आघाडी, युवती सेनेने हे काम तंतोतंत करावे. मतदार संघातील जनसंपर्क वाढवावा जेणेकरून विरोधकांचा अपप्रचार मतदारचं खोडून काढतील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा अशा सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला असून, याठिकाणी फक्त धनुष्यबाण चालतो. लोकसभेला विरोधकांच्या मताधिक्याला लगाम लावला. या विधानसभेला आम्ही गाफिल न राहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनांचं पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी कोल्हापूरातून आम्ही सज्ज राहू अशी ग्वाही दिली. यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राहुल शेवाळे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, माजी आमदार चंद्रदीप नरके, युवासेना महाराष्ट्र सचिव किरण साळी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा सेना प. महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना महानगर प्रमुख शिवाजीराव जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर महिला मेळावा
लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर अभिषेक लॉन जुना बुधवार पेठ येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील महिलांचा मेळावा झाला. यामध्ये खासदार शिंदे यांनी महाराष्ट्र माझे कुटुंब हिच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री शिंदे अनेक कल्याणकारी योजना राबवत आहेत. त्यामुळे पुढील काळात बहिणींनी त्यांचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन केले. यावेळी शिवसेना महिला आघाडीकडून खासदार शिंदे यांना चांदीची गदा देवून स्वागत करण्यात आले. यावेळी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सिद्धी रांगणेकर, अमरजा पाटील, समन्वयक पुजा भोर, युवती सेना शहरप्रमुख नम्रता भोसले, मंगल कुलकर्णी आदी उपस्थित होते.