कुळे ते वास्को लोकल ट्रेक पुर्ववत करण्यासाठी खासदार सदानंद तानावडे यांनी मांडला प्रश्न
आमदार डॉ. गणेश गावकर व स्थानक सरपंचानी मानले आभार : सुस्त रेल्वे प्रशासनाला आाणली जाग
धारबांदोडा : मागील तीन महिन्यापासून बंदावस्थेत असलेल्या कुळे ते वास्को रेल्वे लोकल ट्रेन पुर्ववत सुरू करण्यासाठी गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत प्रश्न मांडला. रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही ट्रेन पुर्ववत सुरू होत नसल्याने याप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. या कृतीचे सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर तसेच काले व कुळे शिगांव पंचायतीच्या सरपंचांनी खासदार तानावडे यांचे आभार व्यक्त केले आहे. कुळे ते वास्को धावणारी 07379 लोकल रेल्वे व वास्को ते कुळे धावणारी 07380 लोकल रेल्वे पुर्ववत सुरू करण्याची मागणी राज्यसभेचे उपसभापती श्री हरिवंश यांच्याकडे करीत केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांचे लक्ष वेधले. काले, कुळे तसेच दक्षिण गोव्यातील प्रवासी, कामगार व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या दोन्ही रेल्वे बंद असल्याने बराच त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेची इतर सर्व वाहतूक सुरळीत सुरू असूनही या मार्गावरील लोकल रेल्वे का बंद केली अशी कैफियत त्यांनी मांडली. तातडीने दोन्ही लोकल रेल्वे पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यसभेत गोव्याचा प्रश्न मांडताना केले. दरम्यान चार दिवसापुर्वी कुळे शिगांव, काले पंचायतीतर्फे तीन महिन्यापासून बंद असलेल्या लोकल रेल्वे पुर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे मास्तरांना निवेदन सादर केले होती मागणी पुर्ण न झाल्यास रेल्वे रोकोचा ईशारा दिला होता.