धीरज साहू भाजपमध्ये गेले तर लगेच स्वच्छ होतील; खासदार प्रियांका चतुर्वेदींचं भाजपला प्रत्युत्तर
काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरात ३५३ कोटींची रोकड सापडल्यानं संपूर्ण देशभर याची चर्चा होत आहे. ही आयती संधी साधत पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काँग्रेसच्या आडून भाजपनं इंडिया आघाडीवरही हल्लाबोल केला आहे. दरम्यान शिवसेनेच्या (ठाकरे गट) राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
यावर 'साहूंच्या भ्रष्टाचारावर काँग्रेसनं गप्प बसणं साहजिक आहे. कारण, भ्रष्टाचार ही त्यांची प्रवृत्ती आहे. मात्र, जेडीयू, आरजेडी, द्रमुक आणि सपा हे सगळे गप्प बसले आहेत. पंतप्रधान मोदी हे तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची मोहीम या लोकांनी का चालवली हे आता पुढं येतंय. भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्याची भीती त्यांना आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते.याच टीकेला प्रियांका चतुर्वेदी यांनी शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
'साहू यांच्यासोबत उभं राहणं म्हणजे त्यांच्या कृतीचं समर्थन करणं असं होत नाही. भाजप आरोप करण्याची संधीच शोधत असतो. सगळे विरोधी पक्ष साहू यांच्या पाठीशी आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. साहू हे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांचा दोष पक्षाला देणं चुकीचं आहे, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.'साहू हे भाजपमध्ये सहभागी झाले तर ते लगेच स्वच्छ होतील. मोदींच्या वॉशिंग मशीनमधून त्यांना काढलं जाईल आणि सर्व आरोपांपासून त्यांना मुक्त केलं जाईल, असा टोला चतुर्वेदी यांनी लगावला आहे.