खासदार पप्पू यादवांना बिश्नोई टोळीकडून धमकी
अपक्ष खासदाराकडुन सुरक्षेची मागणी
वृत्तसंस्था/ पाटणा
लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून बिहारमधील खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यादव यांनी यासंबंधी बिहार पोलिसांकडे तक्रार केली असून केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून याविषयी कळविले आहे. पप्पू यादव यांनी गृह मंत्रालयाकडे ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्याची मागणी केली आहे. सध्या मला ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा पुरविली जात आहे, परंतु सातत्याने धमक्या मिळत असल्याने जीवाला धोका आहे. सुरक्षा वाढविण्यात न आल्यास कधीही माझी हत्या होऊ शकते असा दावा पप्पू यादव यांनी केला आहे.
लॉरेन्स टोळीकडून धमक्या मिळत आहे. माझी हत्या झाल्यास सरकार जबाबदार असेल असे म्हणत यादव यांनी प्रत्येक जिल्ह्यात स्वत:साठी पोलीस एस्कॉर्ट आणि कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षेची मागणी देखील केली आहे.
सुरक्षेबद्दल सरकार निष्क्रीय
देशात लॉरेन्स बिश्नोई टोळी सातत्याने गुन्हेगारी कारवाया घडवून आणत आहे. मी राजकीय व्यक्ती असल्याने बिश्नोई टोळीला विरोध केला, यामुळे टोळीकडून मला कॉल करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे सरकार सुरक्षेबद्दल निष्क्रीय दिसून येत आहे. माझ्या हत्येनंतर लोकसभा आणि विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यासाठी सरकार सक्रीय होईल असे वाटते. यापूर्वी माझ्यावर आणि माझ्या परिवाराच्या सदस्यांवर हल्ले झाले आहेत. अनेकदा नेपाळच्या माओवादी संघटनेसमवेत अनेक गुन्हेगारांनी हल्ले केले आहेत. ईश्वराच्या कृपेमुळे या हल्ल्यांमधून मी वाचत राहिलो असे उद्गार पप्पू यादव यांनी काढले आहेत.
सुरक्षा कमी असल्याने गुन्हेगारांचे फावतेय
नेपाळच्या माओवादी संघटनेने मला धमकी दिल्यावर 2015 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय प्लस सुरक्षा पुरविली होती. पंरतु 2019 मध्ये वाय श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली. सुरक्षेत कमी जवान तैनात करण्यात आल्याने गुन्हेगारनी मला धमकाविण्यास सुरुवात केली आहे. यासंबंधी सरकारला लेखी स्वरुपात कळविले, परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा यादव यांनी केला.
सलमान मुद्द्यापासुन दूर राहण्याची ताकीद
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुद्द्यापासून दूर राहण्याची ताकीद फोन कॉलद्वारे देण्यात आल्याचा दावा खासदार यादव यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी बिहारच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे.