मोरारजी देसाई निवासी शाळेला खासदार जारकीहोळी यांची भेट
विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस : उत्तम सुविधा देण्याच्या सूचना
बेळगाव : हिरेकोडी, ता. चिकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेतील अस्वस्थ विद्यार्थ्यांची भेट घेऊन चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी त्यांची विचारपूस केली. त्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे उपचार देण्याची सूचनाही त्यांनी केली. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. शिक्षक व वॉर्डननी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे, केवळ काही महिन्यांपूर्वी याच निवासी शाळेतील 120 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. आता त्याच वसतिगृहातील विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेण्याची सूचना खासदारांनी केली. वसतिगृहातील स्वयंपाक खोलीला भेट देऊन अन्नधान्याची पाहणी केली. उत्तम शिक्षण व सुविधा मिळते, या विश्वासाने गरीब मुले निवासी शाळेला येतात. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे अशा विद्यार्थ्यांच्या समस्येत भर पडते. शिक्षण संस्था व निवासी शाळेतील दुर्लक्षपणा आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, प्रांताधिकारी,समाज कल्याण व आरोग्य खात्याचे अधिकारी, प्राचार्य, वॉर्डन आदी उपस्थित होते.