For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वसई ते सावंतवाडी थेट रेल्वेसेवेची शक्यता ?

04:45 PM Oct 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
वसई ते सावंतवाडी थेट रेल्वेसेवेची शक्यता
Advertisement

खासदार हेमंत सावरा रेल्वे बोर्डाच्या दरबारी

Advertisement

न्हावेली /वार्ताहर
पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांनी वसई, विरार आणि नालासोपारा परिसरातून कोकणात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सतीश कुमार यांना पत्र लिहून वसई ते सावंतवाडी दरम्यान दररोज थेट रेल्वेसेवा सुरू करण्याची आणि १३१३३/३४ सी.एस.एम.टी. - मंगलोर एक्सप्रेसला सावंतवाडी स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांची गैरसोय आणि अनेक वर्षांची मागणी.!

Advertisement

वसई, विरार,नालासोपारा या भागातून दररोज हजारो प्रवासी कोकणच्या दिशेने प्रवास करतात. विशेषतः गणेशोत्सव आणि होळीच्या सणांमध्ये ही गर्दी प्रचंड वाढते.सध्या या प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी बोरिवली, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) गाठावे लागते.यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो, तसेच त्यांना अतिरिक्त त्रासाला सामोरे लागावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी वसईहून सावंतवाडीसाठी थेट गाडी सुरू करावी, ही हजारो प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून,कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या मुंबई विभागातील (नालासोपारा) सदस्य श्री लक्ष्मण पाटकर, श्री राजन बिर्जे तसेच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री शांताराम नाईक यांनी तेथील स्थानिक आमदार श्री राजन नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली होती. आमदार नाईक यांनी या मागणीचा पाठपुरावा करत खासदार डॉ. हेमंत सावरा यांना १ ऑगस्ट २०२५ रोजी पत्र लिहून रेल्वे मंत्रालयाकडे हा विषय मांडण्याची विनंती केली.आमदारांच्या पत्राची दखल घेत खासदार डॉ. सावरा यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी थेट रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत वसई आणि सावंतवाडी दरम्यान थेट दैनिक रेल्वे सेवा सुरू करणे.सी.एस.एम.टी. - मंगलोर एक्सप्रेस (ट्रेन क्र. १२१३३/३४) ला सावंतवाडी स्थानकावर नियमित थांबा देणे.या मागण्यांमुळे केवळ प्रवाशांची गैरसोय दूर होणार, तसेच या महत्त्वाच्या मार्गावरील रेल्वे नेटवर्कची कार्यक्षमता देखील वाढेल, असे डॉ. सावरा यांनी पत्रात नमूद केले आहे.

सावंतवाडी टर्मिनसचा विकासही आवश्यक.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या मुंबई विभागाने सावंतवाडी रेल्वे स्थानकातील अर्धवट टर्मिनसकडे आणि अपुऱ्या सुविधांकडेही लक्ष वेधले आहे. स्थानकावर परिपूर्ण निवारा शेड, अतिरिक्त प्लॅटफॉर्म व टर्मिनस लाईन होण्यासाठी संघटनेच्या मुंबई विभागातील पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यात आमदार राजन नाईक,आमदार संजय उपाध्याय, आमदार महेश सावंत आदींची भेट घेतली होती. आणि या स्थानकाचा समावेश केंद्राच्या 'अमृत भारत स्टेशन योजने' अंतर्गत निधी उपलब्ध करून परिपूर्ण टर्मिनस आणि कोचिंग डेपो पूर्ण करावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या या पुढाकारामुळे वसई-विरार परिसरातील लाखो कोकणवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या असून, रेल्वे मंत्रालय यावर सकारात्मक निर्णय घेईल,अशी अपेक्षा कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री विनोद नाईक, उपाध्यक्ष श्री प्रकाश येडगे, आणि विशाल तळवडेकर यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.