खासदार धनंजय महाडिक यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
कोल्हापूर :
जिल्ह्यात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हयातील विविध मतदान केंद्रावर नागरिक मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावत आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी खासदार महाडिक यांनी, कोल्हापूरतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनवण्यासाठी राज्यभरात नागरिकांच्यात उत्साह असल्याचे सांगितले.
खासदार महाडिक म्हणाले, 2019 चे 2025 दरम्यान जनतेनं पहिले अडीच वर्ष महाविकास आघाडीचा कारभार पाहिला आहे आणि नंतरचे अडीच वर्ष महायुतीचे सरकारचं काम पाहिलेलं आहे. पहिल्या अडीच वर्षात स्थगितीचा सरकार प्रसिद्ध होता. तर घोटाळेबाज, भ्रष्टाचार आणि उद्योगपतींना त्रास देणारे सरकार होतं आणि मुख्यमंत्री घरातूनच सरकार चालवत होते. पण नंतरच्या अडीच वर्षात आमच्या सरकारने मोठ्या प्रामाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलेली आहे. लोककल्याणकारी योजनांचा धुमधडाका आमच्या सरकारने लावला आहे. यामुळे आमचे सरकार अतिशय लोकप्रिय झालेलं आहे. नागरिक मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडून महायुतीच्या सरकारला पाठबळ देत आहेत. मला विश्वास आहे. २३ तारखेला महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बनेल.
विरोधकांकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नाही, कोणताही अजेंडा नाही आणि कोणतेही व्हीजन नाही. त्यामुळे ज्या मुद्द्यावर पडदा पडलेला आहे त्यावर चर्चा करून लोकांची दया मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची गरज नाही. जिल्ह्यात १०-० होईल हे मी एक महिन्यापूर्वी सांगितले होते. कारण जिल्ह्यात सध्या अभूतपूर्व परिस्थिती झाली आहे. जिल्ह्यातील सर्व दिग्गज नेते हे महायुतीच्या बाजूने आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला शून्य आणि महायुतीला १० जागा मिळतील, असा विश्वास खासदार महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला.
खासदार महाडिक यांना यावेळी विनोद तावडे यांच्या विषयी विचारणा केल्यास, विरोधकांकडे प्रचारासाठी काही मुद्दे नसल्यामुळे ते असे केविलवाणे प्रयत्न करत आहेत. ते आमच्या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहेत, ते असे पैसे कसे वाटू शकतील. असे विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.