सीमाप्रश्न तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची निवड
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी नेमलेल्या तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांची निवड करण्यात आली. याबद्दल म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे धैर्यशील माने यांची भेट घेऊन सत्कार केला. तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांची तळमळ महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी केली. उच्चाधिकार समितीच्या पाठोपाठ महाराष्ट्र सरकारकडून गुरुवारी तज्ञ समितीची फेरनिवड करण्यात आली. सहअध्यक्षपदी राज्यसभा सदस्य धनंजय महाडीक, दै. पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, दिनेश ओऊळकर, मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, अॅड. महेश बिर्जे, अॅड. र. वि. पाटील, तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश समितीमध्ये करण्यात आला आहे. अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल धैर्यशील माने यांची सीमाभागातील मराठी भाषिकांनी भेट घेतली. तज्ञ समितीची बैठक लवकरात लवकर घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. तसेच संसद अधिवेशन काळात सीमाप्रश्नावर चर्चा घडवून आणू, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी म. ए. समिती व सीमाप्रश्नाबाबत केलेल्या वक्तव्याची माहिती खासदार माने यांना देण्यात आली.