महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खासदार डी. के. सुरेश यांच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीवरून संसदेत गदारोळ

06:56 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
MP D. K. Suresh
Advertisement

राज्यसभेत तीव्र पडसाद : काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

कर्नाटकासह दक्षिणेतील पाच राज्यांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावे, अशी मागणी करणारे काँग्रेसचे कर्नाटकातील खासदार डी. के. सुरेश यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संसदेत करण्यात आली आहे. सुरेश यांच्या विधानामुळे शुक्रवारी संसदेत प्रचंड गदारोळ निर्माण झाला. त्यांचे विधान देशद्रोही असल्याचा आरोप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केला आहे.

खासदार सुरेश यांनी हे अतिवादग्रस्त आणि प्रक्षोभक विधान गुरुवारी केले होते. त्यावर शुक्रवारी संसदेत काँग्रेसला धारेवर धरण्यात आले होते. दक्षिणेतील राज्यांवर अन्याय केला जात आहे. त्यांना केंद्रीय आर्थिक साहाय्य देण्यात हेतुपुरस्सर आडकाठी केंद्र सरकारकडून केली जात आहे. त्यामुळे दक्षिणेतील पाच राज्यांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावे, अशी भाषा खासदार सुरेश यांनी केली होती.

काँग्रेसने हात झटकले

काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुरेश यांच्या विधानाशी काँग्रेस सहमत नाही, असे

स्पष्ट करत सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. भारत हा एक देश होता, तो एक देश आहे आणि पुढेही एक देश राहील, असे विधान त्यांनी केले. कोणतीही व्यक्ती देश तोडण्याची भाषा करीत असेल, तर काँग्रेस पक्ष ते सहन करणार नाही, याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी, असेही प्रतिपादन खर्गे यांनी यावेळी केले.

पियुष गोयल यांचा घणाघात

सुरेश यांच्या या विधानावर केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील नेते पियुष गोयल यांनी कठोर टीका केली आहे. त्यांनीच प्रथम हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला होता. खासदार सुरेश यांनी असे अश्लाघ्य आणि घृणित विधान करुन या देशाचा, त्याच्या सार्वभौमत्वाचा आणि भारताच्या राज्यघटनेचा घोर अपमान केला आहे. सुरेश यांचे प्रतिपादन देश तोडण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने केलेल असून हा सरळसरळ देशाच्या सार्वभौमावर हल्लाच आहे. सुरेश यांच्यावर यासाठी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ते काँग्रेसचे खासदार असल्याने काँग्रेस या विधानावर हात झटकू शकत नाही. काँग्रेस आणि त्या पक्षाच्या अध्यक्षांनी स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, वातावरण बिघडण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा गोयल यांनी दिला आहे.

व्हिडीओ दाखविण्याची मागणी

सुरेश यांच्या विधानाचा व्हिडीओ दाखवून सत्ताधारी पक्ष सुरेश यांचे पितळ उघडे पाडू शकतो, असे विधान गोयल यांच्या टीकेवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. मात्र, राज्यसभा अध्यक्षांनी खर्गे यांच्या या प्रतिक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुरेश यांच्या विधानाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. तसेच या सभागृहाच्या प्रत्येकाने घटनेला साक्षी ठेवून सत्यकथन करण्याची शपथ घेतली आहे. अशा सभागृहात जेव्हा असा गंभीर आरोप केला जातो, तेव्हा तो सत्य असल्याचे मानले पाहिजे. त्यासाठी व्हिडीओ आणण्याची आवश्यकता नाही, असे बोल त्यांनी सुनावले.

काँग्रेसची कोंडी

डी. के. सुरेश यांच्या या विधानामुळे काँग्रेसची चांगलीच केंडी झाल्याचे संसदेत आणि बाहेरही दिसून येत आहे. सुरेश यांचे हे विधान घटनेच्या उघड विरोधात आहे. तथापि, सुरेश हे प्रबळ खासदार असल्याने काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करु शकणार नाही, असे तज्ञांचे मत आहे. तसेच काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने तो या विधानाचे समर्थनही करु शकणार नाही. या विधानामुळे लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना भारतीय जनता पक्षाच्या हाती आयते कोलीत दिले गेल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

संसदेच्या शिष्टाचार समितीकडे जाणार

सुरेश यांच्याविरोधात संसदेच्या शिष्टाचार समितीकडे तक्रार केली जाईल, असे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले आहे. शिष्टाचार समिती सुरेश यांच्या विरोधात कारवाई करु शकते. त्यांनी केलेले विधान अतिशय गंभीर असून देशविरोधी शक्तींना खतपाणी घालणारे आहे, अशीही टीका आता केली जात आहे.

विधान महागात पडण्याची शक्यता

ड खासदार सुरेश यांचे स्वतंत्र राष्ट्राचे विधान काँग्रेसला महागात पडणार

ड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विधानाचे सर्वत्र तीव्र पडसाद

ड मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्याचा यत्न

ड सुरेश यांच्या विधानाचे प्रकरण संसदेच्या शिष्टाचार समितीकडे जाणार

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article