खा.छत्रपती शाहू महाराज भावूक, राधानगरीतील जलविद्युत केंद्राची पाहणी
राधानगरी / महेश तिरवडे :
खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी नुकतीच राधानगरी धरण परिसरातील शाहूकालीन जुन्या जलविद्युत केंद्राला भेट देऊन या ऐतिहासिक ठिकाणाचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि सर विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी निसरड्या व अवघड वाटांमधून चालत जुन्या पॉवर हाऊसची सखोल पाहणी केली.

- इतिहास सांगताना गहिवरले शाहू महाराज
पाहणीदरम्यान शाहू महाराजांनी जागतिक बँकेच्या सल्लागारांना पॉवर हाऊसचा इतिहास अस्खलित इंग्रजीत समजावून सांगितला. हा इतिहास सांगताना त्यांचा उर भरून आला होता. मात्र, कोणतीही स्पष्ट कारणं न देता या ऐतिहासिक जलविद्युत प्रकल्पाला कृत्रिमरीत्या बंद करण्यात आल्याचे सांगताना महाराज भावूक झाले.
- अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचे किस्से समोर
या पाहणीदरम्यान काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष आणि बेपर्वाईचे किस्सेही समोर आले, जे ऐकून जागतिक बँकेचे सल्लागार डॉ. महंमद फईमुद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अचंबित व्हावं लागलं. मात्र, याबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
यावेळी महाराजांसोबत कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपविभागीय अधिकारी प्रविण पारकर, शाखा अभियंता समीर निरूखे, कृती समितीचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी, सुहास निंबाळकर, माणिक मंडलिक, बशीर राऊत, चंद्रकांत चौगले, फारुख नावळेकर, जनार्दन पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.