बलात्कार प्रकरणात खासदाराला अटक
वृत्तसंस्था/लखनौ
उत्तर प्रदेशातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार राकेश राठोर यांना बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये, यासाठी त्यांनी अटकपूर्ण जामीनासाठी अर्ज केला होता. तथापि, न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर ते पत्रकार परिषद घेत असताना, परिषदेतूनच त्यांना अटक करण्यात आली आहे. तक्रार करणारी माहिला विवाहित असल्याची माहिती देण्यात आली. न्यायालयाने आपला अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळल्याने आपण पोलिसांना शरण येणार आहोत, असे प्रतिपादन राठोर यांनी केले होते. तथापि, पोलिसांनीच त्यांना पत्रकार परिषदेतूनच अटक केली. राठोर यांनी आरोप नाकारला असून राजकीय सूडबुद्धीपोटी खोटे आरोप केले जात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
प्रकरण काय आहे ?
राठोर यांच्या विरोधात एका महिलेने तक्रार सादर केली होती. या महिलेला राठोर यांनी लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला, या महिलेचे शोषण त्यांनी सलग चार वर्षे केले असा तिचा आरोप आहे. 17 जानेवारीला ही तक्रार सादर करण्यात आली होती. हे प्रकरण मिटविण्यासाठी आपल्यावर आणि आपल्या पत्नीवर दबाव आणला जात आहे, अशी तक्रार सदर महिलेल्या पतीनेही 22 जानेवारीला सादर केली होती. खासदारांच्या एका सहकाऱ्याने आपल्या पत्नीविरोधात अत्यंत अश्लील टिप्पणी केल्याचेही पतीचे म्हणणे आहे. या महिलेने आपल्या तक्रारीसह टेलिफोन कॉल आणि कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांना सादर केले आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस पक्षाने अद्याप या प्रकरणासंदर्भात काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. राठोर यांनी मात्र आरोप फेटाळला आहे.
नाव फोडल्याविषयीही तक्रार
खासदाराच्या सहकाऱ्यांनी या महिलेचे परिचय उघड केला असून त्यासंबंधातही संबंधित कायद्यातील तरतुदींच्या अनुसार तक्रार सादर करण्यात आली आहे, अशी माहिती या महिलेच्या पतीने दिली आहे. पिडीतेचा परिचय आणि नाव उघड करणे हा देखील कायद्यानुसार गुन्हा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.