For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदानोत्तर चाचण्यांनंतर हालचाली गतिमान

06:25 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
मतदानोत्तर चाचण्यांनंतर हालचाली गतिमान
Advertisement

विविध पक्षांची यशाची भाकिते, डावपेचांची रचना, विश्लेषणांचाही वर्षाव  : अंतिम निकालाकडे देशवासियांचे लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडली आहे. त्यानंतर विविध वृत्त वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या परिणामांविषयी त्यांची त्यांची सर्वेक्षणे आणि निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. या मतदानोत्तर चाचण्यांनंतर आता राजकीय वर्तुळात हालचाली गतिमान झाल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी आपले पुढचे डावपेच आखण्यास प्रारंभ केला आहे.

Advertisement

मतदानोत्तर चाचण्यांमधून भारतीय जनता पक्षाला राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन राज्यात आघाडी दर्शविण्यात आली आहे. तर काँग्रेस छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये पुढे असल्याचे या चाचण्यांचे म्हणणे आहे. अर्थात, ही केवळ अनुमाने असल्याने 3 डिसेंबरलाच दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व राज्यांमधील चित्र स्पष्ट होईपर्यंत सर्वांनाच प्रतीक्षा करावी लागेल, अशी स्थिती आहे.

भाजपची बैठक होणार ?

मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने दिल्लीत आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली आहे. ही बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. बैठकीत पक्षाने केलेल्या सर्वेक्षणांसह अन्य संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणांवर विचार केला जाणार आहे. पक्ष राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये विजयी होईल, असे प्रतिपादन पक्षाच्या अनेक नेत्यांनी केले आहे. मतदानोत्तर चाचण्यांचा पक्ष आदर करतो. तथापि, खरे परिणाम 3 डिसेंबरलाच मिळणार असून त्यानंतर मुख्य हालचाली होतील. तोपर्यंत सर्वांनाच प्रतीक्षा करावी लागेल, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

काँग्रेसचीही बैठक

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही परिणामांविषयी आम्ही आशावादी असल्याचे वक्तव्य केले. देशभरातील मतदारांचा काँग्रेसकडे कल आहे. त्यामुळे या निवडणुकांचे परिणाम आमच्याच बाजूने लागतील. परिणाम समोर आल्यानंतर पुढील हालचाली केल्या जातील, असेही काही पक्षप्रवक्त्यांनी पत्रकारांना सांगितले.

मतदानोत्तर चाचण्या कितपत अचूक?

मतदानोत्तर चाचण्यांच्या अचूकतेविषयी शाश्वती देता येत नाही. एखाद्या राज्यात अगदी स्पष्टपणे एखाद्या पक्षाच्या दिशेने कल असेल तर अशा चाचण्यांचे निष्कर्ष योग्य ठरतात, असा अनुभव आहे. तथापि, निवडणूक चुरशीची असेल आणि दोनपेक्षा अधिक पक्ष एकमेकांशी तुल्यबळ स्पर्धा करत असतील, तर अशा चाचण्यांची भाकिते चुकीची ठरतात, असेही अनेकदा दिसून आले आहे.

2018 च्या मतदानोत्तर चाचण्या

याच राज्यांमधील गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकांनंतरची अनुमाने एखाददुसरा अपवाद वगळता सपशेल चुकीची ठरली होती. त्यावेळी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन्ही राज्यांमध्ये सत्तापरिवर्तन झाले होते. तथापि, या परिवर्तनाचा अचूक वेध बहुतेक सर्वेक्षण संस्थांना घेता आला नव्हता. मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे त्यावेळी निवडणूक चुरशीची होती. परिणाम काही प्रमाणात अनपेक्षित होते. छत्तीसगडमध्ये स्पष्ट कल असूनही त्याचाही वेध योग्य प्रकारे घेता आला नव्हता. त्यामुळे यावेळी काय होते, यासंबंधी औत्सुक्य आहे.

लोकसभा निवडणुकीवर परिणाम?

या निवडणुकांचे परिणाम कोणत्याही पक्षाच्या पारड्यात पडले, तरी लोकसभेच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकेल काय, हा विषयही आता चर्चेत आहे. मागच्या वेळी याच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कोणताही परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर झाला नव्हता. या पाच राज्यांमधील मतदारांनी भारतीय जनता पक्षालाच पुन्हा अधिक जागा आणि अधिक मते देऊन विजयी केले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवरील परिणामाची चर्चा व्यर्थ आहे, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

Advertisement
Tags :

.