सेटवर सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण अचानक... 'हुकुमाची राणी'च्या सेटवर असं काय घडलं?
सातारा - स्टील फोटोग्राफर म्हणून उत्साहाने मालिकेच्या सेटवर वावरणारा महेश याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच वाढे गावातील 'हुकुमाची राणी' मालिकेच्या सेटवर शोककळा पसरली. महेशला त्या मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय मोठा मोठा करायचा होता. हे त्याचे स्वप्न अधुरेच राहिल्याचे मालिकेचा प्रोडक्शन मॅनेजर आणि महेशचा मित्र संकेत वाघमळे याने सांगितले.
वज्र प्रोडक्शनच्या 'आप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचे शुटींग आसगावमध्येच सुरु होते. त्यावेळी प्रोडक्शन मॅनेजर शेखर सावंत हा महेशला निर्माते संजय खांबे यांच्याकडे घेऊन आला. त्यानंतर तो मालिकेचा स्टील फोटोग्राफर म्हणून रुजू झाला. मनमोकळा स्वभाव, हसत खेळत कलाकारांचे फोटो काढणाऱ्या महेशचा सेटवरचा वावर उत्साहपूर्ण असायचा असे कलावंतांनी सांगितले. महेश सारख्या उमद्या तरुणाचा असा मृत्यू वज्र परिवारासाठी धक्कादायक असल्याची भावना निर्माते संजय खांबे, दिग्दर्शक रोहित पवार यांनी व्यक्त केली.