गोव्यात आज दुखवटा
मुख्यमंत्री, काँग्रेसकडून दु:ख व्यक्त
पणजी : अहमदाबाद येथे गुऊवारी दुपारी झालेल्या भीषण विमान अपघातामुळे प्रचंड मोठी जीवितहानी झाली आहे. या दुर्दैवी अपघातात ज्यांच्यावर आघात झाला त्या शोकाकुल कुटुंबांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी गोवा सरकारने आज दि. 13 जून रोजी एका दिवसाचा राज्य दुखवटा जाहीर केला आहे. या शोककाळात सरकारी सर्व कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सर्व खाते प्रमुख, सरकारी महामंडळे आणि स्वायत्त संस्था यांनी सूचनांचे पालन करावे, असे निर्देश सर्वसाधारण प्रशासन खात्याकडून देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या विमान अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादमध्ये कोसळल्याच्या बातमीने मला खूप दु:ख झाले आहे. या दु:खद काळात माझ्या प्रार्थना आणि विचार विमानातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
काँग्रेसचे सर्व कार्यक्रम रद्द
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमुळे काँग्रेस पक्षानेही दु:ख व्यक्त केले आहे. त्यामुळे आज दि. 13 रोजी पक्षातर्फे आयोजित सर्व संघटनात्मक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दु:ख व्यक्त करताना सांगितले.