Satara News : आरेदरे गावावर शोककळा; पहिल्या अपत्याच्या आगमनापूर्वीच लष्करी जवानांचा दुर्दैवी मृत्यू
वाढे फाटा परिसरात दुचाकी-टेम्पो अपघात;
आरेदरे : वाढे फाटा ते जुना आरटीओ चौक दरम्यान भिक्षेकरी गृह परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव (वय ३२, रा. आरेदरे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरेदरे गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद जाधव हे शुक्रवारी सायंकाळी वाढे फाटा येथून दुचाकी (ॲक्टिव्हा)वरून दरे गावाकडे जात होते. त्यावेळी साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या धडकेत जाधव गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी टेम्पो चालक संदीप बबन शिंदे (रा. पाटखळ) याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद सौरभ अर्जुन जाधव (वय २६, रा. आरेदरे) यांनी दिली आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.
अपघातानंतर २४ तासांत जाधव यांना कन्यारत्नप्रमोद जाधव यांचे अवघ्या एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्यांची पत्नी गर्भवती असून शनिवारी प्रसूतीची तारीख डॉक्टरांनी निश्चित केली होती. पहिल्या अपत्याच्या आगमनाच्या आनंदात त्यांनी लष्करी सेवेतून सुट्टी मंजूर करून आठ दिवसांपूर्वी साताऱ्यात आगमन केले होते. मात्र, नियतीने वेगळाच डाव मांडला.
अपघातानंतर अवघ्या २४ तासांत त्यांच्या पत्नीने कन्यारत्नाला जन्म दिला; परंतु घरी आलेल्या लक्ष्मीचे मुखदर्शन करण्याआधीच प्रमोद जाधव यांचे निधन झाले.या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण आरेदरे गाव शोकसागरात बुडाले असून सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.