For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संभाजी पाटील यांच्याकडून किलीमांजारो पर्वत सर

10:04 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
संभाजी पाटील यांच्याकडून किलीमांजारो पर्वत सर
Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

मूळचे करंबळ, ता. खानापूर येथील व सध्या टांझानिया येथील रहिवासी संभाजी पाटील यांनी गेल्या 28 डिसेंबर रोजी आफ्रिका खंडातील टांझानिया येथील किलीमांजारो पर्वत सर केला आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचा हा आदर्श अन्य तरुणांनी घेण्यासारखा आहे. त्यांनी मुलगी तनुजा हिच्यासह किलीमांजारो पर्वत सर केला आहे. किलीमांजारो हे आफ्रिका खंडातील सर्वात मोठे शिखर आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून 5,895 मीटर आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल तरच हे शिखर आपण सर करू शकतो, असे संभाजी यांनी सांगितले.

संभाजी हे काही वर्षांपासून नोकरीनिमित्त टांझानिया येथे वास्तव्यास आहेत. तालुक्यातील अनेक बेरोजगार युवकांना त्यांनी टांझानिया येथे नोकरी उपलब्ध करून दिली आहे. तेथे त्यांनी भारतीयांची संघटना स्थापन केली आहे. त्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी वैशाली यांनीही तेथील भारतीय महिलांना एकत्र आणून महिला मंडळ स्थापन केले आहे. प्रत्येक भारतीय सण ते सर्वजण मिळून साजरे करतात. भारतीय स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनही साजरे करतात. संभाजी पाटील यांनी आपल्या देशाशी असलेली नाळही जपून ठेवली आहे. वर्षातून एक-दोन वेळा ते आपल्या मूळ गावी येतात. येथील नवोदित क्रीडापटूंना प्रोत्साहन देतात. त्यामुळे त्यांचा खानापूर, बेळगाव परिसरात मोठा मित्रपरिवार आहे. किलीमांजारो पर्वत सर केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.