For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माऊंट एव्हरेस्टचे झालेय कचराकुंड

06:44 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
माऊंट एव्हरेस्टचे झालेय कचराकुंड
Advertisement

जगभरातील गिर्यारोहकांचे सर्वात आवडते स्थान कोणते असेल तर ते जगातील सर्वात ऊंच पर्वतशिखर हिमालयातील माऊंट एव्हरेस्ट हे आहे. पन्नास वर्षांपूर्वी हे शिखर सर करणे हा गिर्यारोहणातील परमोच्च बिंदू मानला जात असे. कालांतराने गिर्यारोहकांची संख्या वाढली. या छंदाचे किंवा कौशल्याचे व्यवसायात रुपांतर झाले. तंत्रज्ञानही सुधारल्याने गिर्यारोहकांच्या हाती चांगली आरोहण साधने आल्याने या अतिशय अवघड आणि धोक्याच्या छंद प्रकारात किंचित सुलभता आली आणि त्यामुळे गिर्यारोहकांची संख्या आणखी वाढली. साहजिकच एव्हरेस्टवरही अधिक गर्दी होऊ लागली. गिर्यारोहक त्यांच्यासमवेत आणलेले सामान या शिखरावरच टाकत असल्याने त्याची अवस्था आता एखाद्या कचऱ्याच्या ढिगाप्रमाणे किंवा कचरा कुंडासारखी झाली आहे. नुकतीच नेपाळ सैनिकांच्या एका तुकडीने या शिखराची स्वच्छता केली. तेथून तब्बल 11 टन कचरा हलविण्यात आल्याची माहिती आहे

Advertisement

दु:खाची बाब अशी की, या कचऱ्यात चार मृतदेह आणि एक मानवी अस्थिपंजर सैनिकांच्या हाती लागला. आता या मृतदेहांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. एव्हरेस्ट प्रमाणेच त्याच्या जवळच्या आणखी दोन पर्वतशिखरांवरील कचरा स्वच्छ करण्यात आला आहे. या स्वच्छता कार्याला नेपाळच्या सैनिक तुकडीला 55 दिवसांचा कालावधी लागल्याची माहिती आहे.

किती गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर जायचे, यावर नेपाळ सरकारचे नियंत्रण आहे. मे मध्ये संपलेल्या यंदाच्या हंगामात 478 गिर्यारोहकांना एव्हरेस्ट सर करण्याची अनुमती देण्यात आली होती. गिर्यारोहक आणि त्यांचे नेपाळी मार्गदर्शक असे मिळून ही संख्या 600 च्या आसपास जाते. या शिखराची एवढी स्वच्छता करुनही अद्याप तेथे आणखी 50 टन कचरा आणि साधारणत: 200 मृतदेह आहेत, असे अनुमान आहे. आता, जे गिर्यारोहक एव्हरेस्टवर सामान घेऊन जातील, त्यांनी परतताना सामान घेऊनच परतावे, असा नवा नियम आता नेपाळने केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.