गवा रेड्याच्या हल्ल्यात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी
माडखोल- सांगेली या मुख्य रस्त्यादरम्यानची घटना
ओटवणे प्रतिनिधी
गव्या रेड्यांच्या कळपातील एका गवारेड्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री माडखोल - सांगेली या मुख्य रस्ता दरम्यान मलशिनयेवाडी येथे घडली. नेमक्या याच वेळी पाठीमागून येणाऱ्या दोघा मोटारसायकलस्वारांनी आरडाओरड केल्यामुळे गव्या रेड्यांनी पळ काढला. अन्यथा अनर्थ घडला असता. सांगेली खळणेवाडी शिवप्रसाद मनोहर सावंत (३५) असे या युवकाचे नाव आहे . शिवप्रसाद सावंत हा युवक गोवा येथील मोपा विमानतळ येथे कामाला आहे. नेहमीप्रमाणे तो गुरुवारी रात्री १०:३० च्या सुमारास मोटार सायकलने घरी येत असताना ही घटना घडली. या हल्ल्यात शिवप्रसादच्या कमरेला व पायाला गंभीर दुखापत झाली. तर मोटरसायकलचे सुमारे २० हजार रुपयाचे नुकसान झाले. वन खात्याला या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच जखमी शिवप्रसाद सावंत याची विचारपूस केली. या घटनेमुळे सांगेली माडखोल परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनखात्याने याची तात्काळ दखल घेऊन माडखोल देऊळवाडी मार्गे- खळणेवाडी सांगेली या रस्त्यावर गस्त घालावी तसेच या धोकादायक नव्या रेड्यांच्या कळपाचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातून होत आहे.