For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टँकरच्या चाकाखाली सापडून मोटारसायकल चालक जागीच ठार

12:50 PM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
टँकरच्या चाकाखाली सापडून मोटारसायकल चालक जागीच ठार
Advertisement

हिंदवाडीतील घटना : बुलेटची कारला धडक; एक जखमी

Advertisement

बेळगाव : इर्टिका कारला मागून जोराची धडक दिल्यानंतर रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन पडलेल्या मोटारसायकल चालकाच्या डोक्यावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. तर मागे बसलेला अन्य एकजण जखमी झाला आहे. मंगळवार दि. 23 रोजी दुपारी 3.30 वा. आनंदवाडी येथील कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयानजीक हा अपघात घडला असून गणेश राजू रोडगे (वय 22) रा. हिंदवाडी असे मृत झालेल्याचे नाव आहे. तर अशोक विजय अक्कतंगीनहाळ (वय 32) रा. हिंदवाडी असे जखमीचे नाव आहे. अपघाताची नोंद दक्षिण रहदारी पोलीस स्थानकात झाली आहे. याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी की, गणेश आणि अशोक हे दोघेजण मंगळवारी दुपारी 3.30 च्या दरम्यान नाथ पै सर्कलकडून गोवावेस सर्कलकडे बुलेट मोटारसायकलवरून चालले होते.

गणेश हा मोटारसायकल चालवत  होता तर अशोक मागे बसला होता. हिंदवाडी येथील कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयानजीक आल्यानंतर बुलेटची समोरील इर्टिका कारला धडक बसली. त्यामुळे चालक गणेश रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन पडला. तितक्यात गोवावेसकडून नाथ पै सर्कलकडे येणाऱ्या डिझेलवाहू टँकरच्या चाकाखाली तो सापडल्याने चिरडून जागीच ठार झाला. तर अशोक बाहेर फेकला गेल्याने केवळ सुदैवानेच बचावला. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती समजताच दक्षिण रहदारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागृहात हलविण्यात आला. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

Advertisement

हेल्मेट परिधान केले असते तर...

‘हेल्मेट परिधान करा आणि जीव वाचवा’ अशी जनजागृती पोलीस आयुक्तालयाकडून केली जात आहे. मात्र अद्यापही बहुतांश वाहनचालकांमध्ये हेल्मेटच्या वापराबाबत म्हणावी तशी जनजागृती झाली नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी दुपारी हिंदवाडी येथे झालेल्या अपघाताच्या घटनेत मोटारसायकल चालक गणेशने हेल्मेट परिधान केले नव्हते. त्याने हेल्मेट परिधान केले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Advertisement
Tags :

.