डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
कोल्हापूर :
महापालिका कचाऱ्याच्या डंपरखाली सापडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टेंबलाई उड्डाण पुलानजीक ही घटना घडली. दिनेशसिंग साहबसिंग नायक (वय 33, रा. टाकाळा, मूळ रा. सादाबाद, जि. हातरस, उत्तरप्रदेश) असे मृताचे नांव आहे. अपघातानंतर टेंबलाई उड्डाणपूलावर वाहतूकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. अपघातप्रकरणी डंपर चालक अमित आकाराम पाटील (वय 35, रा. प्रगतीनगर, पाचगाव) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील एका मॉलमध्ये दिनेशसिंग हा मेहंदी आर्टीस्ट म्हणून काम करत होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास कामानिमित्त बाहेर पडला होता. टेंबलाई उड्डाणपुलाजवळ दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना कसबा बावडा झूम प्रकल्पाकडे जाणाऱ्या डंपरने त्याला समोरून धडक दिली. तो तोल जाऊन खाली कोसळला. डंपरचे चाक त्याच्या पोटावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. नागरीकांनी या घटनेची माहिती तात्काळ शाहूपुरी पोलिसांना दिली. शाहूपुरी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह सिपीआर रुग्णालयात नेला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.अपघात झाल्याची माहिती मिळताच कोल्हापूरात राहणारे त्याचे मित्र, नातेवाईक सीपीआरमध्ये जमले. दिनेशसिंगच्या मागे पत्नी, तीन मुले असा परिवार असून ते सर्वजण मूळ गावी राहण्यास आहेत.
- सुमारे तासभर वाहतूक कोंडी
अपघातानंतर टेंबलाई उड्डाण पुलाजवळ वाहतूकीची कोंडी झाली होती. सुमारे 1 तास वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या होत्या. शिवाजी विद्यापीठ तसेच ताराराणी पुतळा ते रेल्वे पुल येथे पर्यंत या रांगा लागल्या होत्या. राजारामपुरीतून कावळा नाक्याकडे जाणारी वाहतूकही खोळंबली होती.