मिरजवाडीजवळ अपघातात मोटरसायकलस्वार ठार
सांगली
आष्टा सांगली रस्त्यावर मिरजवाडी जवळ स्विफ्ट डिझायर कारने मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ठार झाला. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे. सौरभ नामदेव माळी (वय 20) राहणार जुना बुधगाव रोड बायपास सांगली असे या अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी तऊणाचे नाव आहे. पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कार चालक सुशांत भिकाजी पाटील (रा. शिंगणापूर, जिल्हा कोल्हापूर) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली आधिक माहिती अशी, शानिवारी दुपारी बाराच्या सुमारास सौरभ माळी हा मोटरसायकल वरून सांगलीहून आष्ट्याच्या दिशेने जात असताना मिरजवाडी येथील बालाजी स्टील समोर आला असता सांगलीच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारने मोटरसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटरसायकल वरील सौरभ माळी हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सांगली सिव्हिल ऊग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी श्रीधर संजय माळी यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कार चालक सुशांत भिकाजी पाटील याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.