गांधींविरोधात अधिकार हनन प्रस्ताव
राष्ट्रपतींचा उल्लेख ‘पुअर लेडी’ असा केल्याने अवमान : भाजप खासदारांचा प्रस्ताव
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात संसदेत अधिकार हनन प्रस्ताव मांडण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदारांनी हा प्रस्ताव दिला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषण केल्यानंतर, त्यांचा उल्लेख सोनिया गांधी यांनी ‘पुअर लेडी’ असा केला होता. त्यामुळे राष्ट्रपतींची अवमानना झाली आहे, असा या पक्षाचा आरोप आहे.
भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी या संदर्भात राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या एक पत्र पाठविले आहे. सोनिया गांधी यांच्या टिप्पणीने राष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा डागाळली आहे. त्यांचे हे विधान सांसदीय प्रक्रियांना धाब्यावर बसविणारे आहे. या टिप्पणीतून सोनिया गांधी यांची अनुसूचित जमातींच्या विरोधातली मनोवृत्ती दिसून येते. सोनिया गांधी आजही वनवासी लोकांची स्थिती समजून घेण्याच्या परिस्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपतींचा असा अवमानजनक उल्लेख केला आहे, असे प्रतिपादन या खासदारांनी केले आहे.
लोकसभा अध्यक्षांनाही पत्र
सोनिया गांधी सध्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही एक पत्र पाठविले असून त्यात सोनिया गांधी यांच्यावर अधिकार हनन प्रस्ताव का मांडण्यात आला याची कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. महिला विरोधी आणि वनवासी विरोधी मनोवृत्तीतून अशी विधाने निर्माण होतात. त्यामुळे त्यांची नोंद घेणे आणि अशी विधाने करणाऱ्या सदस्यांविरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक ठरते. त्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षांनी या प्रस्तावाचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन या पत्रात करण्यात आले आहे. जनतेसमोर सुयोग्य वर्तणुकीचा आदर्श ठेवणे, हे खासदार या नात्याने आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी त्यांच्या उद्गारासंदर्भात जनतेकडे क्षमायाचना करावी, अशी मागणी खासदारांनी केली.
गांधी यांनी काय म्हटले होते ?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी काही टिप्पणी केल्या होत्या. भाषणा वाचताना मुर्मू थकल्या होत्या. ही योग्य बाब नव्हती. त्यांचे भाषण कंटाळवाणे होते. तेच तेच मुद्दे त्या परत परत वाचत होत्या, अशी टीका गांधी यांनी केली होती. त्यामुळे मोठे वादंग निर्माण झालेले आहे.
भाजपचा आक्षेप काय...
सोनिया गांधी यांचे विधान बेजबाबदार आहे. अभिभाषणील मुद्दे पटले नसतील तर त्यांच्यावर टीका केली जाऊ शकते. तथापि, सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्यावर व्यक्तीश: अवमानजनक टिप्पणी केली आहे. ही टिप्पणी राष्ट्रपती आणि त्यांचे पद यांचा अवमान करणारी आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या विरोधात कारवाई केली जावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
अधिकार हनन प्रस्ताव काय...
संसदेच्या सभागृहांचे सदस्य असलेल्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य सभागृहाबाहेर केल्यास त्यांच्या विरोधात अधिकार हनन प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. संसदेच्या सदस्यांना काही विशेषाधिकार असतात. त्यांचा भंग केल्यास असा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. सभागृहाच्या अध्यक्षांनी हा प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकारल्यास चर्चेनंतर असे अधिकार हनन करणाऱ्या सदस्याची कानउघाडणी केली जाऊ शकते. त्याच्यावर ताशेरे ओढले जाऊ शकतात. तसेच प्रकरण गंभीर असल्यास अशा सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकारही संसदेला आहे. तसे झाल्यास असे अधिकार हनन करणाऱ्या सदस्याला त्याची सभागृहातील जागा गमवावी लागते, अशी माहिती अधिकार हनन प्रस्तावासंदर्भात तज्ञांकडून दिली गेली आहे.
सोनिया गांधी यांचा निषेध
ड राष्ट्रपतींसंबंधी विधानासाठी भारतीय जनता पक्षाकडून गांधीवर टीका
ड दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांना खासदारांनी पाठविले हनन प्रस्ताव पत्र
ड अध्यक्षांनी प्रस्ताव स्वीकारल्यास तो चर्चेला पुढील सप्ताहात येणे शक्य
ड सोनिया गांधी यांनी देशाची क्षमायाचना करावी, अशी भाजपची मागणी