भाजप खासदारांविरोधात संसदेत प्रस्ताव
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील खासदार संबीत पात्रा आणि निशिकांत दुबे यांच्याविरोधात काँग्रेसने विशेषाधिकार हनन प्रस्ताव सादर केला आहे. या खासदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ते देशद्रोही असल्याचा आणि त्यांचे अमेरिकेतील वादग्रस्त उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांच्या संदर्भात हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
काँग्रेसने नंतर या प्रस्तावाची माहिती दिली. लोकसभेच्या अध्यक्षांनी या प्रस्तावावर शुक्रवारीच आपला निर्णय द्यावा अशी आमची मागणी होती. तथापि, शुक्रवारी प्रश्नोत्तरांचा तास रद्द करण्यात आला. तसेच ज्या खासदाराविरोधात आम्ही हा प्रस्ताव सादर केला आहे, त्याला पुन्हा सदनात बोलण्याची अनुमती देण्यात आली. ही कृती आक्षेपार्ह असल्याची टीका काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली. केंद्र सरकार काँग्रेसची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमचा आवाज दाबला जात आहे. आमच्यावर बुलडोझर फिरविण्याची या सरकारची प्रवृत्ती आहे, अशी अनेक प्रकारची टीका विविध काँग्रेस नेत्यांनी केली.
अदानीसंबंधी काँग्रेसची विधाने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्योगपती अदानी यांच्याशी संबंध आहेत, असा आरोप प्रथम काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केला होता. या संबंधांमुळेच केंद्र सरकार अदानी यांची चौकशी करीत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती. हे आरोप या नेत्यांनी बुधवारी संसदे सदनाच्या बाहेर निदर्शने करताना केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाचे खासदार संबीत पात्रा आणि निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. गांधी हे देशद्रोही असून ते भारताचे सरकार आणि भारताची अर्थव्यवस्था स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे वादग्रस्त उद्योगपती जॉर्ज सोरोस याच्याशी संबंध आहेत, अशा अर्थाचे आरोप या दोन्ही नेत्यांनी केले होते. अशा प्रकारची ही वादावादी आहे.