मातेच्या दुधाच्या स्वादाचे आईस्क्रीम
आईचे दूध विकणारी माणसे आम्हाला आमच्या पक्षात नकोत, अशा अर्थाचे एक विधान महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षांपूर्वी गाजले आहे. पण आता खरोखरच आईच्या दुधाचा स्वाद असलेले आइस्क्रीम बाजारात उपलब्ध होणार आहे. लहान मुलांसाठी अन्नपदार्थ बनविणारी अमेरिकेतील फ्रीडा नामक कंपनी हे आईस्क्रीम बाजारात आणणार आहे. ते आगामी 9 महिन्यांमध्ये उपलब्ध होईल. सध्या बाजारात व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट अशा अनेक नमुन्यांच्या स्वादाची आईस्क्रीम्स उपलब्ध आहेत. त्यांच्यात आता या स्वादाची भर पडणार आहे.
अपत्याचा जन्म होण्यासाठी मातेला 9 महिने वाट पहावी लागते. त्याचप्रमाणे हे आईस्क्रीमही 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या हाती येईल, अशी जाहीरात या कंपनीने केली आहे. मात्र, कंपनीने एक महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते असे, की या आईस्क्रीमचा स्वाद जरी मातेच्या दुधासारखा असला, तरी त्यात प्रत्यक्षात मातेचे दूध असणार नाही. या आईस्क्रीमची निर्मिती ‘प्लँट बेस्ड’ दुधापासून केली जाणार आहे. त्यात किंचितसा व्हॅनिलाचा स्वाद मिसळला जाणार आहे.
फ्रीडा कंपनी हे आईस्क्रीम इको फ्रेंडली पॅकिंगमधून सादर करणार आहे. या आईस्क्रीमच्या एका कटोरीची किंवा पॅकची किंमत 9 डॉलर्स इतकी असू शकेल, असेही कंपनीने घोषित केले आहे. या आईस्क्रीमसह कंपनी आपले नवे उत्पादन मॅन्युअल ब्रेस्टपंपसह सादर करणार आहे. अर्थातच, हे आईस्क्रीम आणि हा पंप यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. पण कंपनीच्या या दोन्ही उत्पादनांचे लाँचिंग एकाचवेळी होणार आहे, हा एक योगायोग असे म्हणता येईल.