माझा श्रीधर पुढे आहे, याचा अभिमान! जम्मू-काश्मीरमधील DIG श्रीधर पाटील यांच्या आईशी संवाद
2011 साली तो सगळ्या परीक्षा पास करत साहेब झाला.
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : काश्मीरमध्ये साऱ्या कारवाईत माझा श्रीधर पुढे, याचा खूप अभिमान वाटतो. पण आई म्हणून काळजाचा एक कोपरा कुठेतरी लकलकतोच. जम्मू-काश्मीरमधील पोलीस दलाचे डीआयजी श्रीधर पाटील यांच्या आई बबुबाई या ‘तरुण भारत संवाद'शी बोलत होत्या.
श्रीधर पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कोतोली पैकी पाटीलवाडी गावचे. ते जम्मू काश्मीर पोलीस दलात डीआयजी पदावर आहेत. गेली 13 वर्षे ते काश्मीरलाच आहेत. काश्मीरमधील त्यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर, श्रीधरबाबू म्हणून ते सर्वांना परिचित आहेत.
काश्मीरमध्ये आताच नव्हे तर यापूर्वी झालेल्या कारवाईतही त्यांचा सहभाग आहे. तशा अल्पकाळ सेवेतही ते राष्ट्रपती पदकाचे मानकरी त्यांच्या कर्तृत्वामुळे ठरले आहेत. गेले काही दिवस काश्मीरमधील घटना आणि आपल्या देशाची पाकिस्तानमधील दहशतवादाविरोधात सुरू असलेली सशस्त्र चढाई याची सर्वत्र चर्चा आहे. अशा कारवाईत श्रीधर पाटील यांचा सहभाग आहे.
सारा देश गेले दोन ते तीन दिवस या कारवाईचे क्षण टीव्हीसमोर बसून पाहतो आहे. पण कारवाईत थेट सहभागी असलेल्या श्रीधर पाटील यांच्या आईची नजर मात्र अभिमान आणि थोडी काळजी अशा संमिश्र भावनांनी डबडबलेली आहे. त्यांच्याशी बोलताना या माऊलीला काय बोलू, कसं बोलू, आणि किती बोलू असे वाटत होते.
त्या म्हणाल्या, आपल्याला काश्मीरमध्ये जाणे, तेथे फिरणे म्हणजे खूप चांगले वाटते. कारण आपला काश्मीर आहेच तसा. तिथे 2011 मध्ये श्रीधरला पोलीस अधिकारी म्हणून संधी मिळाली. मला खूप आनंद झाला. पण आपल्या पोराची संधी बघायला श्रीधरचा बापही हवा होता. आम्ही शेतीभाती करणारे, आपण बरं, आपलं बरं अशा घरातले.
असं म्हणत श्रीधरच्या आई पुढे भरभरून सांगू लागल्या. त्या म्हणाल्या, श्रीधर कोकरूडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. त्याला पुढे शिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी कागल नवोदयमध्ये घालायचे ठरवले. श्रीधरची तिथे निवडही झाली, पण श्रीधर नकोच म्हणायचा. बाप म्हणतो पोराला नवोदयमध्ये घालायचे आणि पोरगा मात्र काकुळतीला येऊन मला तिकडे नको, असे म्हणायचा.
यावेळी आई म्हणून माझी कोंडी व्हायची. पण शेवटी त्याला कागल नवोदयमध्ये घातला. पण तो मी तिथे राहणार नाही, मला तुमच्याजवळ रहायचे आहे, असे म्हणत चक्क नवोदय मधून तो परत आला. त्याचे बाबा तर रागाने त्याच्याशी काही दिवस बोललेच नाहीत. तो दहावी-बारावीला कोकरूडमध्येच राहिला आणि पास झाला. तेव्हा आमच्या भागात विश्वास नांगरे-पाटलांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होते आणि श्रीधर मी तसाच होणार हे सारखं बोलून दाखवत होता.
आम्ही ठरवले याला बळ द्यायचे. तोवर त्याचे बाबा वारले आणि माझा थोरला मुलगा अरुणने घराची जबाबदारी घेतली. श्रीधरला त्याने बळ दिले. यूपीएससी परीक्षेला तयारीसाठी त्याला पुणे, मुंबई, दिल्लीला पाठवले. मला माहीत होतं तो जिद्दी आहे, जे काय मनात घेणार ते पूर्ण करणार, याची खात्री होती आणि तसंच झालं. 2011 साली तो सगळ्या परीक्षा पास करत साहेब झाला.
काश्मीरमध्ये डीएसपी म्हणून हजर झाला. त्या म्हणाल्या, काश्मीर म्हणजे सगळीकडे हिरवंगार आणि तिकडं लई थंडी, तेवढंच मला माहीत होते, त्यामुळे आनंद झाला. आमच्या गावचा देव भोगेश्वर त्याला जाऊन पहिलं डोकं टेकवून नमस्कार केला. पहिली काही वर्षे त्याची नोकरी फार व्यवस्थित होती. पण नंतर नंतर काश्मीरमध्ये रोज काही ना काही घडत राहिले.
टीव्हीवर मी ते बघते. श्रीधरला फोन करून काय झाले विचारते. तो म्हणतो, काळजी करू नकोस आणि सारखं टीव्ही बघू नकोस. तो वर्षाला एक दोनदा गावाकडे येतो. किंवा आम्हाला बोलावतो. मी तर काही महिन्यांपूर्वी जाऊन आले. गेल्या 10 ते 15 दिवसात मात्र जे काही तिथे सुरू आहे ते मोठ्या चिंतेचे आहे.
या साऱ्या कारवाईत माझा श्रीधर पुढे आहे, याचा अभिमान आहे. घरी अनेक जणांचे फोन येत आहेत. मला माझा मोठा मुलगा रमेशने ओळखीच्या माणसाशिवाय कोणाचा फोन घेऊ नको, असे सांगितले आहे. तेही बरोबर आहे. पण पोराचं कौतुक होते म्हटल्यावर मला सांगावसं वाटतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो.
आता जोरात लढाई सुरू आहे. टीव्हीवर विमान बघतोय, जाळ बघतोय, धडाधडा आवाज ऐकतोय, आपल्या भारताची ताकद पाहतोय. या साऱ्यात माझा श्रीधर कुठेतरी आहे याचा अभिमान वाटतो. कपाळावर मी ठळक बुक्का लावते. या साऱ्यांना बळ दे रे बाबा असं देवापुढे म्हणतो. पण एक आई म्हणून श्रीधर बद्दल काळजाचा कोपरा हळूच कुठेतरी लकलकतोच.