For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mother's day 2025: पोसलेला दहशतवाद समूळ नष्ट करा, वीरमाता आनंदीबाई उलपेंचे आवाहन

01:13 PM May 11, 2025 IST | Snehal Patil
mother s day 2025  पोसलेला दहशतवाद समूळ नष्ट करा  वीरमाता आनंदीबाई उलपेंचे आवाहन
Advertisement

सध्या भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला योग्यच आहे

Advertisement

By : सचिन बरगे

कोल्हापूर (कसबा बावडा) : माझा मुलगा देशासाठी हुतात्मा झाला. तो गेल्याचे दु:ख तर आहेच, पण त्यापेक्षाही त्याने देशासाठी हौतात्म्य पत्करल्याचा मला सार्थ अभिमान आहे. सध्या भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला योग्यच आहे. त्यांनी पोसलेला दहशतवाद समूळ नष्ट केला पाहिजे, असे ठाम मत कारगील युद्धात शहीद झालेल्या दिगंबर संदेशराव उलपे यांच्या मातोश्री आनंदीबाई संदेशराव उलपे मांडतात.

Advertisement

माय निस्वार्थ प्रेमाने आपल्या मुलांना जन्म देते, वाढवते आणि योग्य संस्कार देते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कसबा बावड्यातील हुतात्मा जवान दिगंबर संदेशराव उलपे यांच्या मातोश्री आनंदीबाई संदेशराव उलपे. यांचे पती संदेशराव उलपे हे कारखान्यांमध्ये कर्मचारी होते. दोन मुलगे आणि एक मुलगी असलेल्या आनंदीबाई यांचा संसार सुखात चालला होता.

दुर्दैवाने 1998 ला आनंदीबाई यांच्या पतीचे निधन झाले. तीन मुलांची जबाबदारी एकट्या आनंदीबाई यांच्यावर पडली. बिकट परिस्थितीत खचून न जाता आनंदीबाई यांनी शेतात काबाडकष्ट करून आपल्या तिन्ही मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार दिले. शेतातली वैरण विकून आपल्या मुलाबाळांचा सांभाळ केला.

आनंदीबाई ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता संसाराचा गाडा ओढत राहिल्या. पुढे मुलं मोठी झाल्यानंतर मोठा मुलगा प्रकाश आपल्या वडिलांच्या जागी रोजंदारीवर कारखान्यात कामाला लागला. मुलीचे लग्नही आनंदीबाई यांनी स्वकष्टातून केले. दोन्ही मुलांपैकी एक मुलगा देशाची सेवा करण्यासाठी पाठवायचा असा निश्चय आनंदीबाई यांनी मुले शाळेत शिकत असतानाच केला होता.

त्यानुसार धाकटा मुलगा दिगंबर याला शालेय जीवनातच आई आनंदीबाई यांनी देशसेवेचे धडे देण्यास सुरुवात केली. दिगंबर आईची इच्छा पूर्ण करत 25 ऑगस्ट 1996 ला सैन्यात भरती झाला. ‘आज मी जो काही आहे तो फक्त माझ्या आईमुळे आहे. आईने मला देशसेवेची प्रेरणा दिल्यामुळे मी सैन्यात भरती झालो’, असे मत त्यावेळी दिगंबर यांनी व्यक्त केले होते.

ऑगस्ट 2000 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानने उरी सेक्टरवर अचानक हमला केला. त्यावेळी दिगंबर उलपे हे आपली सेवा बजावत असताना हुतात्मा झाले. ही बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली. आनंदीबाई पती गेल्याचे दु:ख विसरतात तोच मुलगा गेल्याची बातमी त्यांच्या कानी पडली. त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत आपला मुलगा देशसेवेसाठी हुतात्मा झाल्याने मला सार्थ अभिमान असून प्रत्येक मातांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन घडवावे, असा संदेश दिला.

जिथे जन्म आहे त्याचा मृत्यू अटळ असून जन्म आणि मृत्यू दरम्यान मुलांनी स्वत:सह आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे. सध्या सुरु असलेल्या सीमेवरील तणावपूर्व वातावरणात मातांनी लढाईसाठी गेलेल्या आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊन देशासाठी दहशतवाद संपवण्यासाठी ताकद देऊन दहशतवादाला समूळ काढून टाकण्याचे त्यांनी आवाहन केले.

Advertisement
Tags :

.