आई
`DeeF&` ही हाक मराठी माणसाच्या हृदयाच्या आतल्या कप्प्यात सदैव जागी असते. ती कुठल्या क्षणी केव्हा ओठांवर येईल हे काही सांगता येत नाही. तिला वयाचेही बंधन नाही. देह जराजर्जर होतो तेव्हा पुन्हा बालपण उमलून येते आणि आई आई गं या हाका अविरत आदिम बंधाला साद घालतात. कुणी बांधले हे नाते? जिवाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आईची आठवण काळजात दिव्यासारखी प्रकाशत असते. भारतीय संस्कृतीमध्ये आई ही विविधतेने प्रकटते आणि पिढय़ानपिढय़ा माणसांना जगण्याचे, उन्नत होण्याचे शिक्षण देते. तिची पूजा बांधणे समाजाला आवडते. उत्पत्ती, स्थिती, लय असे विश्वाचे चक्र सुरळीत ठेवणारे श्री दत्तप्रभू अवतार नाहीत, कारण अवताराला समाप्ती असते. श्री श्रीधर स्वामी म्हणतात, ‘अवतार उदंड होती, सवेची विलया मागुती जाती, तैसी नोहे श्री दत्तात्रेय मूर्ती, नाश कल्पांती असेना’. श्री दत्तात्रयांचा वास हा चिरंतन आहे. म्हणूनच ते भक्तांसमोर साक्षात प्रकट होत असतात. श्री दत्तात्रयांची माता अनसूया हिची शिकवण ‘अतिथी देवो भव’ अशी आहे. जेव्हा पृथ्वी दुष्काळामुळे शुष्क झाली व सारे जीव अन्नपाण्याविना तडफडू लागले तेव्हा अनसूया मातेने आपल्या पुत्राला तपश्चर्येतून जागे केले. कमंडलूतील जल श्री दत्तात्रयांनी शिंपडल्यावर पृथ्वी सुजलाम सुफलाम झाली. श्री दत्तरूपात विश्व सामावले आहे हे माहीत असूनही अनसूया मातेला श्री दत्तप्रभूंनी आईचे सुख दिले. ‘मुकं करोति वाचालं’. वाचा देणारे दत्त बाळ होऊन तिच्याशी बोबडे बोल बोलू लागले. ‘पंगु लंघयते गिरिम्’ पांगळय़ाला चालवणारे प्रभू मातेकडे अडखळत येऊन तिच्या गळय़ात पडत होते. अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या उदरात सामावले आहेत त्याला अनसूयेने कडेवर घेतले. वात्सल्यसुखाचा आनंद मातेला देऊन आपण भक्तीला वश होतो हे श्री दत्तप्रभूंनी जगाला दाखवून दिले.
श्रीराम आणि कौसल्या माता यांचे नाते आगळेवेगळेच. कौसल्येच्या गर्भात असतानाच श्रीराम प्रभूंनी रात्री एकांतात आपल्या शक्तीसह पूर्ण रुपात कौसल्येला सगुण रूपात दर्शन देऊन विचारले, ‘तुला काय हवं? मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे.’ कौसल्या म्हणाली, माझा जन्म धन्य झाला. मात्र माझं समाधान अजून झालेले नाही.प्रभू आश्चर्याने म्हणाले, यापेक्षा अजून तुला काय हवं? कौसल्या म्हणाली, तुम्ही विश्वपिता आहात म्हणून जग तुमच्या मागे दे दे म्हणत फिरत आहे तसे तुम्ही आई आई म्हणत बाळ होऊन माझ्यामागे फिरावे अशी प्रेमाची भूक मला लागली आहे. श्रीरामांनी ही मागणी पुरी केली आणि श्रीरामजन्म झाला. श्रीकृष्णांना दोन माता होत्या. एक जन्म देणारी आणि दुसरी पालनपोषण करणारी.देवकी आणि यशोदा. संत एकनाथ महाराज एका भजनात म्हणतात, डाव्या गुडघ्याने रांगतो अन् आई मला लोणी दे म्हणतो. दही, दूध, लोण्यासाठी हट्ट करणाऱया बाळाच्या मातेबद्दल ते म्हणतात, यशोदा माता पुण्यवान होती, आई म्हणतो हा जगजेठी. श्रीकृष्ण जेव्हा गोकुळ सोडून निघाला तेव्हा यशोदा त्याला म्हणाली, मी तुला दोरीने बांधलं होतं हा प्रसंग तू मनात न ठेवता विसरून जा. कृष्ण म्हणाला, आई मी द्वारकाधीश होईन. 16000 राण्यांचा पती होईन. 56 कोटी यादवांचा सम्राट होईन. पण तू मला प्रेमाच्या दोरीने बांधलं होतं हे मी विसरणार नाही. मी केवळ तुझाच आहे. तुझ्याशिवाय मला कुणी बांधू शकत नाही. विशुद्ध भक्तीने परमात्म्याला बांधून ठेवणारी यशोदामैया म्हणजे भक्तीचा विजय आहे, असे पू. डोंगरे महाराज म्हणत. श्रीमद्भागवतामध्ये श्री नारदांचे चरित्र आहे. नारद हे दासीपुत्र होते. त्यांची आई जिथे काम करीत असे तिथेच त्यांना सत्संग घडला. सद्गुरुंचा अनुग्रह लाभला. त्यांनी त्यांचे नाव हरिदास असे ठेवले. त्यांचे सद्गुरु जेव्हा गाव सोडून निघाले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला. गुरुदेव म्हणाले, तुझा विधिलेख सांगतो की तू तुझ्या आईचा ऋणानुबंधी पुत्र आहेस. तुझ्या आईला सोडून आलास तर पुन्हा तुला जन्म घ्यावा लागेल आणि आम्हाला तुझ्या आईचे तळतळाट भोगावे लागतील. तू फक्त नामस्मरण कर. श्रीकृष्ण तुझे भले करतील. श्री नारादांनी दिवस-रात्र जप केला. त्यांच्या आईला ते आवडत नसे. एक दिवस कर्मबंध संपला. आईला सर्पदंश झाला आणि तिने शरीर सोडले.नारद मातृऋणातून मुक्त झाले. नारदांना वाटले, ही प्रभू कृपा आहे. भक्त प्रल्हादाला श्री नारदांचा मातेच्या गर्भात असतानाच अनुग्रह झाला. इंद्राने कयाधू म्हणजे प्रल्हादाच्या आईला दैत्यगृहातून उचलून नेले तेव्हा ती रडू लागली. इंद्राला नारदांनी थांबवून सांगितले की हिच्या उदरात देवद्वेष्टा नसून महान भगवद् भक्त आणि निर्दोष सेवक वाढतो आहे. तू हिला सोडून दे. नारदांची आज्ञा प्रमाण मानून इंद्राने कयाधूला सोडून दिले. देवश्री नारदाने गर्भातील प्रल्हादाला धर्माचे भक्तीरूप तत्त्व आणि आत्मानात्मविवेकरूप निर्मल ज्ञान यांचा उपदेश केला. भक्त प्रल्हाद म्हणतात, माझी आई हे सारे विसरून गेली. मात्र श्री नारदांच्या अनुग्रहामुळे मला विस्मृती झाली नाही.
बाळ ध्रुवाचे चरित्र आजही घरोघरी सांगितले जाते. राजा असणाऱया पित्याच्या मांडीवर बसू न देता गर्विष्टपणे ध्रुवाची सावत्र आई त्याला म्हणाली, तू राजपुत्र असलास तरी भलत्याच स्त्रीच्या पोटी जन्माला आला आहेस. तुला राजा व्हायचे असेल तर तप करून ईश्वराला प्रसन्न कर आणि त्याच्या अनुग्रहाने माझ्या पोटी जन्म कसा येईल असा प्रयत्न कर म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. सावत्र आईच्या या बोलांमुळे ध्रुवाचे आयुष्य बालपणीच बदलून गेले. अंतर्यामी जागृत झालेला ध्रुव आई सुनीतीचा उपदेश आणि शिकवणीमुळे भगवंताच्या चरणकमलांची सेवा करण्यास निघून गेला. त्रैलोक्मयातील उत्कृष्ट स्थान मिळावे म्हणून सन्मार्गाचा उपदेश देवषी नारदांनी ध्रुवाला केला. भगवान श्रीहरीचा साक्षात्कार झाल्यानंतर अढळपद घेऊन तो जेव्हा आपल्या घरी राजधानीला परतला तेव्हा सावत्र माता सुरुचीनेच त्याला प्रथम उचलून अलिंगन देत चिरंजीव हो असा आशीर्वाद दिला. ध्रुवाने नंतर पुष्कळ वर्षे धर्माने राज्य केले. विष्णूने त्याच्यासाठी विमान पाठवले. मृत्यूच्या मस्तकी पाय देऊन जेव्हा ध्रुव विष्णूलोकाला निघाला तेव्हा त्याला आपल्या आईचे स्मरण झाले. समोर बघतो तो काय दुसऱया विमानात बसून ती ध्रुवाच्या पुढे चालली होती. उत्तम संततीमुळे आईलाही मोक्ष
मिळतो.
महाभारतातील कर्ण जेव्हा पांडवांना उद्धटपणे भलतेसलते बोलत असे तेव्हा युधि÷िर सोडून सर्वांना चीड येत असे. भीमाने युधि÷िराला विचारले, दादा, तुला कर्णाचा संताप येत नाही का? तेव्हा युधि÷राने दिलेले उत्तर आईची महती सांगणारे आहे. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी याचे अप्रतिम वर्णन केले आहे. युधि÷िर म्हणतो, कर्ण जेव्हा मवाल्यासारखे वर्तन करतो त्यावेळी मी खाली मान घालतो आणि माझी नजर कर्णाच्या पायाकडे जाते. त्याचे पाय हुबेहूब कुंती मातेसारखे आहेत. मला आईची आठवण येते आणि हिमालयाएवढा प्रचंड राग घरंगळून खाली येतो. पुराणांत, ग्रंथांत, महाकाव्यात क्षणोक्षणी भेटणारी आई हे भारतीय संस्कृतीचे ऐश्वर्य आहे.
-स्नेहा शिनखेडे