आई झाडूवाली, पुत्र अधिकारी
बिहारमधील जिहानाबाद येथील मनोज कुमार सध्या एका सरकारी कार्यालयात एसडीओ पदी आहेत. त्यांची आई त्याच कार्यालयात झाडूवालीचे काम करते. अशा तऱहेचे हे अनोखे उदाहरण असल्याचे सांगण्यात येते. अरवल येथील सावित्रीदेवी अत्यंत गरीब परिस्थितीत जीवनाशी संघर्ष करत आपले आयुष्य घालवित होत्या. सरकारी कार्यालयामध्ये तुटपुंज्या पगाराची झाडूवालीची नोकरी त्यांनी मिळविली होती. आपल्याला शिकायला मिळाले नाही तरी मुलांनी शिकून मोठे व्हावे, ही प्रबळ इच्छा होती. त्यानुसार त्यांनी आपल्या अपुऱया उत्पन्नातही मुलांना शिकवून मोठे केले. त्यांचे पती रामबाबू प्रसाद शेतमजूर होते.
त्यांना झाडूवालीची नोकरी मिळाली, तेव्हा त्यांचे पुत्र मनोज कुमार दहावीच्या वर्गात होते. चांगल्या गुणांनी दहावी झाल्यानंतर त्यांनी पुढे पदवीचे शिक्षण घेतले आणि सरकारी नोकरीसाठी अर्ज केला. सचिवालयातील ज्या कार्यालयात त्यांची आई झाडूवाली म्हणून काम करत होती, तेथेच त्यांना ज्ये÷ अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. हा योगायोग त्यांच्या परिचितांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 2009 मध्ये त्यांची आई सेवानिवृत्त झाली. ते अजूनही याच कार्यालयात ज्ये÷ अधिकारी म्हणून कार्य करत आहेत. आपल्या प्रगतीचे श्रेय ते आईच्या कष्टांना देतात. आई झाडूवाली असलेल्या कार्यालयात आपण अधिकारी म्हणून नियुक्त झालो, तेव्हा आपल्याला पहिले काही दिवस अतिशय संकोच वाटत होता, असा अनुभव ते कथन करतात. सावित्रीबाईंना मात्र मुलाचा रास्त अभिमान वाटतो.