माता बचावली, मात्र चार बालकांचा दुर्दैवी अंत
कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रकार : विजापूर जिह्यातील बेनाळनजीकची हृदयद्रावक घटना : परिसरात हळहळ
वार्ताहर/जमखंडी
कौटुंबिक वादातून राग अनावर झाल्याने पोटच्या चार मुलांना कालव्यात ढकलून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न मातेने केला. यात दुर्दैवाने चार मुलांना जलसमाधी मिळाली असून मातेला वाचविण्यात मच्छीमारांना यश आले आहे. सदर घटना सोमवारी विजापूर जिह्यातील निडगुंदी तालुक्यातील बेनाळनजीक अलमट्टीच्या डाव्या कालव्यात घडली. तनु बजंत्री (वय 5), रक्षा बजंत्री (वय 3), हसन बजंत्री व हुसेन बजंत्री (दोघांचे वय 13 महिने) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. तर भाग्या निंगराज बजंत्री (वय 30, रा. तेलगी, तालुका कोलार) असे बचावलेल्या मातेचे नाव आहे. घटनेविषयी समजलेली माहिती अशी, भाग्या हिचा पती निंगराज याचा आपल्या भावांसोबत मालमत्तेवरुन वाद सुरू होता. यावेळी भावांनी निंगराज याला मालमत्तेतील वाटा देण्यास नकार दिला होता. याच कारणावरुन सोमवारी त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली.