नव्या विक्रमासाठी आई-मुलगा सज्ज
आज 12 तास जलतरण करणार
बेळगाव : इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होवू शकते. हे आपण पाहिले आहे. अशाच एका विक्रमासाठी आता आई आणि मुलगा दि. 5 सप्टेंबर रोजी सज्ज झाले आहेत. तब्बल 12 तास जलतरण करण्याचा त्यांचा ध्यास आहे. यातून ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड येथे नोंदणीसाठी प्रयत्न करणार आहेत. आई ज्योती कोरी आणि मुलगा विहान कोरी यांनी या रेकॉर्डसाठी तयारी केली आहे. स्विमर्स व अॅक्वेरियस क्लब आयोजित गुरूवार दि. 5 सप्टेंबर रोजी पहाटे 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जेएनएमसीच्या जलतरण तलावात ते हा विक्रम नोंदविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
ज्योती कोरी या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या तांत्रिक अधिकारी असून त्यांनी सरकार मान्यता जलतरण स्पर्धेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवून आतापर्यंत 26 पदकांची कमाई केली आहे. त्याच प्रमाणे श्रीलंका येथे झालेल्या निमंत्रितांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने सहा पदके मिळविली होती. त्यांचा चिरंजीव विहान कोरी हा सेंट झेवियर्स स्कूल येथे शिकत असून त्याने शालेय विविध स्पर्धेतून 22 पदके मिळविली आहेत. त्यामध्ये जिल्हा, राज्यस्तरीय स्तरावर त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिलांनी केवळ चूल-मुलात न अडकता आपल्या आरोग्यासाठी पोहणे किती लाभदायक आहे, याचे उदाहरण त्यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. जलतरणापासून आपले शरीर स़दृढ बनते व इतर व्यायामांमुळेही आपण निरोगी राहू शकतो, असे आवाहन त्यांनी केले. ज्योती कोरी यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर व इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.