For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आई-मुलाचा प्रवास ठरला अखेरचा! मलकापुरात उसाने भरलेली ट्रॉली दुचाकीवर पलटी; आईचा मृत्यू, मुलगा गंभीर

02:10 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
आई मुलाचा प्रवास ठरला अखेरचा  मलकापुरात उसाने भरलेली ट्रॉली दुचाकीवर पलटी  आईचा मृत्यू  मुलगा गंभीर
Advertisement
मलकापूर, कराड : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अचानक ब्रेक लावल्याने मागील उसाने भरलेली ट्रॉली पलटी होऊन दुचाकीवर कोसळली. या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. गुरुवारी (५ नोव्हेंबर) सकाळी सुमारे १० वाजता मलकापुरातील आगाशिवनगर येथील कोणार्क पार्कसमोर ही दुर्घटना घडली. अपघातामुळे ढेबेवाडी-कराड मार्गावरील वाहतूक जवळपास तासभर विस्कळित झाली. मालन मोहन सुतार (वय ६०, रा. काढणे, ता. पाटण) असे मृत महिलेचे नाव असून, यशवंत मोहन सुतार (वय २८) हा तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अचानक ब्रेकमुळे ट्रॉली पलटी

मिळालेल्या माहितीनुसार, चचेगाव येथून ऊस घेऊन ट्रॅक्टर दोन ट्रॉलींसह कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे जात होता. आगाशिवनगरमधील कोणार्क पार्कसमोर ट्रॅक्टर पोहोचला असता, अपार्टमेंटमधून अचानक एक दुचाकीस्वार रस्त्यावर आल्याने चालकाने त्याला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक लावला. यामुळे मागील उसाने भरलेली ट्रॉली नियंत्रणाबाहेर जाऊन विरुद्ध दिशेला पलटी झाली.

Advertisement

त्याचवेळी कराडमधील काम आटोपून मालन सुतार आणि त्यांचा मुलगा यशवंत दुचाकीवरून काढणे गावाकडे परतत होते. पलटी झालेली ट्रॉली त्यांच्या दुचाकीवर कोसळल्याने दोघेही उसाच्या ढिगाऱ्याखाली दबले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर त्यांना कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, मालन सुतार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

बघ्यांच्या गर्दीमुळे बचावकार्यात अडथळे

अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. ढेबेवाडीहून कराडकडे आणि कराडहून ढेबेवाडीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. बघ्यांच्या गर्दीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाल्याने पोलिसांना नागरिकांना बाजूला करण्यासाठी पलटी झालेल्या ट्रॉलीतील ऊस हातात घेऊनही गर्दी हटवावी लागली.

Advertisement

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बाबर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मलकापूरचे नगराध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदतकार्य केले.

सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर क्रेनच्या मदतीने पलटी झालेली ट्रॉली बाजूला करण्यात आली. रस्त्यावर पडलेला ऊस हटवून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.