For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एलपीजी सिलिंडर स्फोटात आई, मुलगा जखमी

01:00 PM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
एलपीजी सिलिंडर स्फोटात आई  मुलगा जखमी
Advertisement

भाटीवाडा - नेऊल येथील घटना : दोघांवरही गोमेकॉत उपचार सुरू

Advertisement

पणजी : भाटीवाडा नेरूल येथे स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून (एलपीजी) झालेल्या गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाल्याने आई व मुलगा जखमी झाल्याची घटना काल रविवारी सकाळी 7: 45 वाजण्याच्या सुमारास घडली. गॅस गळतीनंतर झालेल्या स्फोटात घराच्या खिडकीच्या काचा फुटून 15 मीटरपर्यंत उडालेल्या होत्या तसेच यावेळी मोठा आवाज झाला व आगीचा भडका उडाल्याने वाड्यावरील लोक हादरले. आवाज ऐकून जमा झालेल्या लोकांनी त्वरित हालचाली केल्या आणि आई व मुलाला कांदोळी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. नंतर तेथून त्यांना गोमेकॉत पाठविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जखमी झालेल्यांमध्ये जया जीवन शिरोडकर (50) व दिलेश जीवन शिरोडकर (21) या दोघांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वीच दिलेश याचे वडील जीवन शिरोडकर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे घरात आई आणि मुलगा दोघेच राहत होते. दिलेश हा इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. त्यांचे घर एका खोलीचेच आहे. जखमी आई व मुलगा घरात झोपले होते. जया यांनी सकाळी चहा करण्यासाठी  गॅस पेटवला. लायटर पेटवताच आगीचा भडका उडाला व त्या जमिनीवर कोसळल्या. मुलगा दिलेश हा देखील बिछान्यावरून खाली कोसळला व दोघेही आगीत होरपळले.

Advertisement

जया शिरोडकर या 30 टक्के तर मुलगा दिलेश हा 20 टक्के भाजला  आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दामोदर पेडणेकर, दत्ता सिनारी, नरेंद्र शेट्यो, भावेश शिरोडकर जितेंद्र बली, व परेश गावस घटनास्थळी दाखल झाले. पर्वरी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घरातील सामान जळत होते. अग्निशामक जवानांनी ही आग विझवली. अग्निशमन दलाचे उपअधिकारी राजेंद्र हळदणकर व पिळर्णचे अधिकारी दामोदर पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीत शिरोडकर कुटुंबीयाच्या घरातील संपूर्ण साहित्य जळाले आहे. तसेच घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अंदाजे 5 ते 10 लाखांची हानी या दुर्घटनेत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जखमी झालेल्या दोघांचीही जबानी घेतल्यानंतर नुकसानीचा आकडा स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.