मुलीचा खून करणाऱ्या आईला जन्मठेप, 1.10 लाखांचा दंड
पणजी : बार्देश तालुक्यातील शिरसई येथे स्वत:च्याच मुलीचा लाटण्याने खून करणारी आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिला जन्मठेप आणि 1.10 लाख रुपये दंडाची शिक्षा पणजी येथील बाल न्यायालयाच्या अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी ठोठावली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी 14 ऑगस्ट 2022 रोजी कपेलवाडा - शिरसई येथे ही धक्कादायक घटना घडली होती. एका आईने वैतागून रागाच्या भरात आपल्या पाच महिन्यांच्या मुलीवर लाटण्याच्या सहाय्याने वार करुन तिची हत्या केली होती. पाच महिन्यांच्या चिमुकलीचे वडिल सुदन गोंडलेकर यांनी 14 ऑगस्ट 2022 रोजी उत्तररात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास चिमुकलीला रक्ताच्या थारोळ्यात बास्केटमध्ये घालून कोलवाळ पोलिस्थानक गाठले होते. पोलिसांनी त्वरित चिमुकलीला म्हापशातील जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर शवचिकित्सेनंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक मंदार परब यांनी तक्रार दाखल केली होती.
तत्कालीन पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक यांनी चिमुकलीच्या खूनप्रकरणी आई वडिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी आई अर्मिंदा डोरा फर्नांडिस आणि वडिल सुदन गोंडलेकर या दोघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या 302 व गोवा बाल कायदा कलम 8 नुसार गुन्हा नोंद केला. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांची चौकशी केली असता, त्यांनी आपल्या जबाबात वारंवार बदल करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिने रागाच्या भरात मुलीला हातातील लाटण्याने मारहाण केली होती. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. या घटनेत हात नसल्याने पोलिसांनी वडिलांना सोडले आणि आईला अटक केली होती.
या प्रकरणी तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आईच्या विरोधात 30 साक्षीदारांची साक्ष नोंदवून 200 पानी आरोपपत्र म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केले. हे प्रकरण बाल न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे तिथे वर्ग करण्यात आले. न्यायालयात सरकारी वकील मिलैना पिंटो आणि थेमा नार्वेकर या दोघांनी बाजू मांडून पुरावे सादर केले. त्यानंतर बाल न्यायालयाने चिमुकलीची आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिला दोषी ठरविले. या प्रकरणी बाल न्यायालयाने आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिला भादंसंच्या कलम 302 (खून) अंतर्गत जन्मठेप आणि 10 हजार ऊपये दंड. दंड न भरल्यास एक वर्षाची कैद. तर गोवा बाल कायद्याचे कलम 8 अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि 1 लाख ऊपये दंड. दंड न भरल्यास दोन वर्षांची साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली आहे.