मातृभाषेचे संवर्धन साहित्य संमेलनातून!
प्रा. रणधीर शिंदे यांचे प्रतिपादन : बेळगुंदी 18 वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात : टाळ मृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडी, महिलांची लक्षणीय उपस्थिती
सध्याच्या आधुनिक युगात मातृभाषेचे संवर्धन हा आव्हानात्मक संघर्षाचा लोकलढा आहे. यासाठी साहित्य संमेलन महत्त्वाचे आहेत. संस्कृतीचा विकास समाजाच्या जाणतेपणावर अवलंबून असतो आणि हे जाणतेपण समाजातील दृष्टा लेखक, कलावंत, साहित्यिक करीत असतो. म्हणून ते समाजात मानबिंदू ठरले जातात. आपली मातृभाषा अवगत झाल्यास अभिजात साहित्य निर्माण करता येते. मराठी भाषा परिपूर्ण, समृद्ध आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक जगात मराठी भाषेचे स्थान उज्ज्वल आहे. जागतिकीकरणांमध्ये मराठी भाषेने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सामान्य माणसांपासून ते बुद्धिवंतांपर्यंत काळजाला हात घालणारी, माणसाला माणूस बनविणारी अशी ही मराठी भाषा आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतलेली व्यक्तीच मोठ्या उच्च पदावर पोहोचू शकते. त्यामुळे ग्रामीण भागात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मातृभाषेचे संवर्धन होते. अशा साहित्य संमेलनाला सर्वांनी सहकार्य करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील प्रा. रणधीर शिंदे यांनी केले.
बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी यांच्या वतीने रविवारी मरगाई देवी मंदिर परिसरात 18 व्या बेळगुंदी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष या नात्याने प्रा. रणधीर शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले, संत साहित्य हे माणसाला कठीण परिस्थितीमध्ये जगण्याची दिशा दाखविते. त्यामुळे आज वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. समाजातील सांस्कृतिक दहशत मोडून काढली पाहिजे. नव्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मराठी भाषा आणि संस्कृती जतनाचा हा लोकलढा साहित्यिकांनी आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी जोपासण्यासाठी अधिक प्रयत्न केला पाहिजे, असेही रणधीर शिंदे यांनी सांगितले.
लक्षवेधी ग्रंथदिंडी
आठराव्या मराठी साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेली ग्रंथदिंडी लक्षणीय ठरली. या ग्रंथदिंडीमध्ये राकसकोप गावातील वारकरी भजनी मंडळींनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता व हनुमान यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. यामुळे या ग्रंथदिंडीत एक नवचैतन्य निर्माण झाले होते. ग्रंथदिंडीमध्ये वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात विविध अभंग गाताना दिसत होते. महिला हातात टाळ घेऊन भजनामध्ये तल्लीन झाल्या होत्या. प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथक सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली. तसेच धन्य निरंकार महिला मंडळाच्या सदस्यांनीही लेझीमच्या ठेक्यावर ताल धरला होता. विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ येळेबैल, महिला मंडळ सोनोली गावातील सांप्रदायिक भजनी मंडळ व बेळगुंदी गावातील भजनी मंडळांनी या ग्रंथदिंडीमध्ये विशेष सहभाग घेतला होता.
ग्रंथदिंडीला रवळनाथ मंदिर येथून सुरुवात झाली. प्रारंभी रवळनाथ मूर्तीचे पूजन नामदेव गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्रंथपूजन नामदेव मोरे, पालखी पूजन अॅड. रमेश पाटील, ध्वजपूजन बाबुराव पाटील, वीणा पूजन ग्रा. पं. माजी अध्यक्षा हेमा हदगल यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीचे उद्घाटन सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दिंडी संपूर्ण गावभर फिरली. ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विविध पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. तसेच ग्रंथदिंडीत महिलांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला.
धर्मवीर संभाजी महाराज मूर्तीचे पूजन एपीएमसी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपूजन शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडी हुतात्मा स्मारकाजवळ आल्यानंतर एन. के. नलवडे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाचे पूजन करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन नगरसेवक रवी साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विनय कदम, कृष्णा गावडा, शिवाजी बोकडे आदींच्या हस्ते व्यासपीठ व इतर पूजन करण्यात आले. साहित्य सरिताचे प्रकाशन अशोक गावडा, ज्योतिबा फगरे, किशोर पाटील, राजू किणयेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
साहित्यिक अजित सगरे यांनी प्रास्ताविक केले. साहित्य संमेलनाचे उद्घाटन जि. पं. माजी सदस्य मोहन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून अर्जुन चौगुले हे होते. अॅङ किशोरी गुरव, बेळगुंदी ग्रा. पं. अध्यक्ष प्रताप सुतार, पौर्णिमा पाटील, सुभाष हदगल, मनोहर बेळगावकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वैशाली भातकांडे, निंगुली चव्हाण, धनंजय मोरे, रंजना गावडा, महादेव पाटील, विठ्ठल नाकाडी, विठ्ठल बागिलगेकर, सुमन गावडा आदींच्या हस्ते विविध देवदेवतांच्या प्रतिमेंचे पूजन करण्यात आले. यावेळी किरण कृष्णा पाटील, विश्रांती नागराज पाटील, रंजना यल्लाप्पा मोरे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन प्रकाश बेळगुळकर यांनी केले. संमेलनाला बेळगुंदीसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. संमेलनाच्या शेवटच्या सत्रात बुंगरवाडी सांगली येथील विजय जाधव यांनी शेतकरी जीवन आणि त्यांच्यासोबत असणारा त्यांचा बैल याबद्दलची कथा सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
बालपणापासूनच चांगले संस्कार हवेत!
संमेलनाच्या दुसऱ्या परिसंवादाच्या सत्रामध्ये प्रा. सुनंदा शेळके यांनी ‘पालक व शिक्षकांची भूमिका’ याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या मुलांचे उज्ज्वल आयुष्य व भविष्य घडविण्यासाठी पालकांनी बालपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार घडवायला हवेत. तसेच शिक्षक त्यांना शिक्षकी ज्ञान देतातच. याबरोबरच त्यांच्या रोजच्या अभ्यासावरही पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. मोबाईलचा अतिरेक टाळला पाहिजे, असेही शेळके यांनी सांगितले.
सामाजिक संदेश देणारे कवीसंमेलन
संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात कवितेचा इंद्रधनु यामध्ये इस्लामपूर सांगली येथील कवीभूषण आनंद हरी व विजयकुमार बेळंकी यांनी विविध सामाजिक संदेश देणाऱ्या कविता सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली.