घरातच तयार केला तुरुंग मुलाला कैदेत ठेवते आई
एका वृद्ध थाई महिलेने स्वत:च्या मुलासाठी घरातच तुरुंग निर्माण केलाआहे. आता तिचा मुलगा घरात निर्माण करण्यात आलेल्या तुरुंगातच राहतो. तुरुंग तयार करताना या महिलेने मुलाला सर्व आवश्यक सुविधा मिळाव्यात याची काळजी घेतली होती. याचमुळे त्याला भोजन आणि पाणी देण्यासाठी लोखंडी गजांदरम्यान एक छोटीशी जागा निर्माण करण्यात आली आहे.
या तुरुंगयुक्त खोलीत बेड, बाथरुम आणि वाय-फाय यासारख्या सुविधा आहेत. मुलाला अन्न आणि पाणी पोहाचविण्यासाठी एक छोटे छिद्रही तयार करवून घेतले आहे. तसेच 24 तास त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एक सीसीटीव्ही सिस्टीम बसविली असल्याचे महिलेने सांगितले आहे.
तुरुंग पाहून भडकले पोलीस
पोलिसांना या महिलेच्या घरात तयार तुरुंगाविषयी कळल्यावर त्यांनी तेथे धाव घेतली. घरातील तुरुंग पाहून पोलिसांनी हे मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. महिलेला मानवाधिकारांचे उल्लंघन आणि अवैध स्वरुपात ताब्यात ठेवण्याप्रकरणी दोषी ठरविले जऊ शकते. महिलेचे कृत्य गुन्हेगारी संहितेतील कलम 310 चे उल्लंघन करणारे आहे. हा प्रकार अवैध ताब्यातमुळे मृत्यू किंवा गंभीर ईजेशी संबंधित आहे आणि याकरता तीन ते 15 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते असे पोलिसांचे म्हणणे आहे.
तुरुंगामागील कारण चकित करणारे
महिलेने घरात तुरुंगात तयार करण्यामागील सांगितलेले कारण चकित करणारे आहे. माझा मुलगा व्यसनांच्या आहारी गेला असून त्याला जुगाराचा नाद आहे. याचमुळे त्याला स्वत:च्या घरात रोखण्यासाठी लोखंडी तुरुंग तयार केला आहे. मागील 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून व्यसनांच्या आहारी गेलेल्या मुलाच्या भीतीच्या सावलीत जगत असल्याचे या महिलेने सांगितले आहे.
मुलापासून वाटते भीती
थायलंडच्या बुरीराम प्रांतातील या महिलेचे वय 64 वर्षे आहे. महिलेने स्वत:ला आणि स्वत:च्या शेजाऱ्यांना मुलाच्या हिंसक कृत्यांपासून वाचविण्यासाठी हा उपाय केला आहे. या तुरुंगात ती स्वत:च्या 42 वर्षीय मुलाला तो हिंसक झाल्यावर कोंडून ठेवते. अनेक वर्षांपासून मुलाला व्यसनांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
शक्य ते सर्व प्रयत्न
देशभरातील 10 हून अधिक विविध केंद्रांमध्ये पुनर्वसनाचे प्रयत्न यात सामील आहे. परंतु यातील काहीच उपयोगी पडलेले नाही, कालौघात मुलगा अधिकच हिंसक होत गेला. मागील 20 वर्षांपासून मी सातत्याने घाबरत जगत आहे. माझ्या पतीच्या निधनानंतर मुलासोबत एकटीच राहते. माझ्या पतीचा मृत्यू हा मुलाच्या ड्रग सेवनामुळे येणारे नैराश्य आणि तणावामुळे झाला होता. मला स्वत:ची आणि शेजाऱ्यांच्या सुरक्षेची चिंता होती याचमुळे स्वत:च्या घरात लोखंडी कोठडी निर्माण करविल्याचे महिलेने म्हटले आहे.