सासू बनली आई, जावयाला दिला नवा जन्म
- पाचगाव येथे किडनी निकामी झालेल्या जावयाला दिली स्वत:ची किडनी
- आईच्या दातृत्त्वामुळे लेकीच्या संसाराला मिळाली नवसंजीवनी
कोल्हापूर
पाचगांव (ता.करवीर) येथील योगेश अशोक चव्हाण यांची सहा महिन्यांपूर्वी किडनी निकामी झाली. किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता, आई, पत्नी किडनी देण्यास तयार झाल्या पण काही कारणास्तव त्यांची किडनी घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला. जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जावयासाठी सासूच आई बनून धावली. कागल येथील रंजना भिमगोंडा सातवेकर यांनी निसंकोचपणे जावई योगेश यांना स्वत:ची किडनी देत एकप्रकारे नवा जन्मच दिला. लग्नाच्या पवित्र बंधनातून निर्माण झालेले सासू अन् जावयाचे नाते आई व मुलाच्या नात्याप्रमाणाचे घट्ट, जिव्हाळ्याचे असते हे रंजना यांनी आपली किडनीदान करत दाखवून दिले. आईच्या या दातृत्त्वामुळे लेकीच्या संसाराला नवसंजीवनी मिळाली आहे.
नऊ वर्षाचा मुलगा, दीड वर्षाची मुलगी नवरा, बायको असे चौघांचे आनंदी कुटुंब योगेश चव्हाण यांचे. सोबत आई, मोठा भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी असे एकत्र गुण्यागोविंदाने पाचगांवमध्ये राहणारा हा चव्हाण परिवार. हसत्या-खेळत्या या कुटुंबातील योगेश यांची किडनी सहा महिन्यांपूर्वी निकामी झाली. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. ंयोगेश यांचा नऊ वर्षांपुर्वी अपघात झाला होता. यावेळी उपचारादरम्यान त्यांना एकच किडनी असल्याचे निदर्शनास आले होते. सहा महिन्यांपूर्वी योगेश यांची प्रकृती बिघडली. यावेळी ते तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेले असता त्यांच्या पुन्हा विविध तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये त्यांची किडनी निकामी झाल्याचे निदर्शनास आले. हे समजताच चव्हाण कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली. संपूण कुटुंब तणावाखाली आले.
डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर चव्हाण कुटुंबियांच्या मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये फेऱ्या सुरु झाल्या. येथील एका खासगी रुग्णालयामध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रीयेसाठी योगेश यांची नाव नोंदणी करण्यात आली. पण किडनी डोनर मिळेपर्यंत त्यांना डायलेसिस सुरु ठेवण्यास सांगितले. त्यानुसार कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये एक दिवस आड डायलेसीसी सुरु झाले. सुमारे सहा महिने त्यांचे डायलेसिस सुरु होते.
आई, पत्नी किडनी देवू न शकल्याने आता किडनी देणार कोण असा प्रश्न चव्हाण कुटुंबियांसमोर उभा रहिला. याच दरम्यान सासू ने जावयाला किडनी दिली व ती शस्त्रक्रीयादेखिल यशस्वी झाली असल्याचे चव्हाण कुटुंबियांना समजले. त्यानंतर योगेश यांच्या पत्नी यांनी आई व माहेरच्या लोकांशी चर्चा केली. यावर योगश यांच्या सासूबाई रंजना सातवेकर यांनी निसंकोचपणे आपण किडनी देण्यास तयार असल्याचे सांगितले. मुंबई येथील रुग्णालयात रंजना यांच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर डॉक्टरांनी रंजना यांची किडनी योगेश यांना देण्यास कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले. 27 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई येथे योगेश यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रीया झाली. शस्त्रक्रीयेला आता एक महिना होत आला असून योगेश यांच्यासह त्यांच्या सासू रंजना यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.