मातेनेच शोधला आश्चर्यकारक उपाय
ब्रिटनमधील वेस्ट मिडलँडस् येथील ही घटना आहे. येथे वास्तव्यास असणाऱ्या 34 वर्षीय जेम्मा लीघन यांच्या सहा महिन्यांच्या नवजात बालिकेला एका समस्येने पछाडले होते. तिच्या चेहऱ्याला नेहमी खाज येत असे. त्यामुळे ही बालिका अजाणतेपणे आपल्या हाताने चेहरा खाजवून घेत असे. त्यामुळे तिचा चेहऱ्यावर जखमा होऊन त्यातून रक्तस्त्राव होऊन तो लालेलाल होत असे. लीघन यांनी अनेक डॉक्टरांकडे आपल्या मुलrला नेऊन उपचार करण्याचा प्रयत्न केला.
या बालिकेला नेमका कोणता विकार आहे, याचा शोध लागत नव्हता. तिचे सगळे वैद्यकीय चाचणी अहवाल सर्वसामान्य होते. त्यामुळे तिच्या चेहऱ्याला इतकी खाज कशामुळे पडते, हे डॉक्टरांनाही कळेनासे झाले होते. त्यांनी अनेक उपाय करुन पाहिले. पण ते निरुपयोगी ठरले. ही मुलगी केवळ सहा महिन्यांची असल्याने ती स्वत: तिला नेमके काय होत आहे, हे सांगण्याच्या स्थितीत नव्हती. तिच्या आईलाही काही कळेनासे झाल्याने च्ंिांता वाढली होती. नेमका हा विकार चेहऱ्यालाच झाल्याने चेहरा विद्रूप होण्याची शक्यता बळावली होती. तसे झाल्यास मोठी झाल्यानंतर या बालिकेला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता होती. तिच्या विकारासमोर तज्ञांनाही हात टेकल्याने परिस्थिती गंभीर होती.
लीघन यांनी आता स्वत:च प्रयत्न करायचा निर्णय घेतला. त्यांनी इंटरनेटवरुन औषधांच्या शोधाला प्रारंभ केला. सर्व उपलब्ध प्रकरांची क्रीम्स आणि मॉयश्चयायझर्स त्यांनी उपयोगात आणली. तथापि, गुण येत नव्हता. पण लीघन यांनी हार न मानता स्वत:चे यत्न पुढे चालू ठेवले. अखेर त्यांना ‘बाल्मंडस् स्कीन साल्व्हेशन’ नामक एक पूर्णत: नैसर्गिक उपाय सापडला. हा लेप वनस्पतीज होता. त्याचा उपाय करताच या मुलीचा विकार पूर्णत: बरा झाला. हजारो पौंड खर्च करुन जो उपाय झाला नव्हता, तो काही पौंडांमध्ये झाला. थोडक्यात सांगायचे, तर ब्रिटनमधील ‘आयुर्वेद’ उपयोगी पडला आणि या मातेची चिंता दूर झाली. या घटनेचा बोध असा की कोणतेही ज्ञान किंवा माहिती कितीही जुनी असली, तरी ती टाकावू मानता कामा नये. जेथे अत्याधुनिक आणि महागडे उपाय थकतात, तेथे पारंपरिक ज्ञान आपला प्रभाव दाखवून देते आणि समस्या सुटते.