Uchgaon Incident | दारूच्या पैशांसाठी आईलाच मारहाण; संतप्त माऊलीने मुलाच्या डोक्यात घातली चिऱ्याची वीट!
मुलाच्या त्रासाला कंटाळून आईचं टोकाचं पाऊल;
उचगाव -दारू पिण्यासाठी पैसे मागून वारंवार मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या मुलाच्या डोक्यात आईनेच चिऱ्याची वीट मारून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास चिंचवाड हायस्कूल जवळ गडमुडशिंगी येथे घडली. सौरभ दिलीप निकम (वय २६ रा. गडमुडशिंगी ता.करवीर ) असे जखमीचे नाव आहे. याबाबत जयश्री सुरेश घाटगे (वय४२ रा. चिंचवाड हायस्कूल गडमुडशिंगी ता करवीर) या जखमीच्या आईवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद सुरेश विलास घाटगे (रा. गडमुडशिंगी) यांनी दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी सौरभ हा आरोपी जयश्री घाडगे यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. जयश्री आणि दुसरे लग्न करून त्या गडमुडशिंगी येथे राहत होत्या. सौरभ याला दारूचे व्यसन असल्याने तो वारंवार आईच्या घरी येऊन दारू पिण्यास पैसे मागून शिवीगाळ करून मारहाण करत होता. शुक्रवारी सकाळी दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून मायलेखांच्यात भांडण सुरू झाले रागाच्या भरात आईनी दारातील चिऱ्याची विट घेऊन मुलाच्या डोक्यात मारली. त्यात सौरभ गंभीर जखमी झाला.
ही माहिती गांधीनगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. आई जयश्री घाडगे हिच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . तिला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल कदम करीत आहेत.