अर्भकाला सोडून पलायन केलेल्या मातेला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रसूतीनंतर अर्भकाला सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागातच सोडून तेथून पलायन केलेल्या मातेचा शोध घेण्यात आला आहे. एपीएमसी पोलिसांनी तिला अटक केली आहे. शनिवारी त्या महिलेला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
बीबीजान सद्दामहुसेन सय्यद (वय 35) रा. इंदिरानगर, बैलहोंगल असे त्या महिलेचे नाव आहे. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी एका पत्रकाद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे.
8 डिसेंबर रोजी बीबीजान प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर नवजात अर्भकाचे पालनपोषण न करता त्याच दिवशी रात्री कोणालाही न सांगता बीबीजान सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागातून निघून गेली होती.
मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास अर्भकाचा मृत्यू झाला. मात्र, तिला जन्म देणारी आईच इस्पितळात नव्हती. म्हणून एपीएमसी पोलीस स्थानकात सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली होती. अर्भकाचा मृतदेह कोणाकडे सोपवायचा, हा पोलिसांसमोर प्रश्न होता. बीबीजानचा व्यवस्थित पत्ताही सापडला नव्हता. पोलिसांनी अखेर तिचा शोध घेऊन तिच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
तीन मुलांचा सांभाळ करणेच कठीण
एपीएमसी पोलिसांनी बीबीजानची कसून चौकशी केली असता, सध्या आपल्याला तीन अपत्ये आहेत. दोन मुलगे व एक मुलगी आहे. तीन मुलांसमवेत ती बैलहोंगलमध्ये राहते. पती सद्दामहुसेन हरिहरमध्ये मोलमजुरी करतो. अधूनमधून बैलहोंगलला भेट देतो. तीन मुलांचा सांभाळ करणेच कठीण झाले आहे. त्यामुळे चौथे अपत्य नको, असा निर्णय घेत आपण नवजात शिशुला इस्पितळात सोडून गेल्याची कबुली तिने दिली आहे.