माता-पुत्राने वायुदलाची धावपट्टीच विकली
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमध्ये पोलिसांनी एक महिला आणि युवकाच्या विरोधात भारतीय वायुदलाची धावपट्टीच विकल्याच्या आरोपाचा गुन्हा नोंदविला आहे. संबंधित महिला अन् युवक हे माता-पुत्र आहेत. 1997 मध्ये बनावट दस्तऐवजांच्या आधारावर हा व्यवहार झाला होता आणि 28 वर्षांनी दोघांवरही गुन्हा नोंद होऊ शकला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून या भूमी व्यवहाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले हेते.
ऊषा अंसल आणि त्यांचा पुत्र नवीन चंद्र विरोधात एफआयआर नोंद झाला आहे. दोघांनीही 1997 मध्ये पंजाबच्या फिरोजपूरमधील भारतीय वायुदलाची धावपट्टी बनावट दस्तऐवजांच्या मदतीने विकली होती. दोघांनीही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या साथीने हे कृत्य केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील या धावपट्टीचा वापर वायुदलाने 1962, 1965 आणि 1971 मध्ये केला होता.
उच्च न्यायालयाने पंजाब दक्षता विभागाच्या मुख्य संचालकांना या आरोपांच्या चौकशीची जबाबदारी सोपविली होती. याप्रकरणी अहवाल 20 जून रोजी सादर करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक करण शर्मा चौकशी करत असून अन्य आरोपींची ओळख पटविली जात आहे. ही धावपट्टी पाकिस्तानच्या सीमेनजीक असलेल्या फट्टुवाला गावात असून ही जमीन सध्या संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणात आहे.
12 मार्च 1945 रोजी ब्रिटिश प्रशासनाने ही जमीन खरेदी केली होती आणि पुढील काळात ही जमीन भारतीय वायुदलाच्या नियंत्रणात राहिली. ऊषा आणि नवीन यांनी फसवणूक करत जमिनीचा मालकी हक्क प्राप्त करत जमीन विकली होती, असे चौकशीतून समोर आले आहे. निवृत्त महसूल अधिकारी निशान सिंह यांनी याप्रकरणी तक्रार केली होती, परंतु त्यावर कित्येक वर्षे कुठलीच कारवाई झाली नाही. 2021 मध्ये हलवारा वायुदल तळाने फिरोजपूर उपायुक्तांकडे याप्रकरणी चौकशीची मागणी केली. यानंतर सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षेवरील संभाव्य धोक्याचा उल्लेख करत फिरोजपूर उपायुक्तांना फटकारले होते. सध्या चौकशी पूर्ण करण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.