मारकुट्या पतीच्या त्रासाला कंटाळून मायलेकीची आत्महत्या
सातारा :
सातारच्या एमआयडीसीतल्या एका कंपनीत गणेश ज्ञानदेव मुंढे हा कामास आहे. मुळ रा. कोरेगाव तालुक्यातील तांदूळवाडीचा असून तो कारंडवाडी येथील एका कॉलनीत पत्नी आणि मुलीसह रहात होता. तो सतत त्याच्या पत्नीला मारहाण करायचा. त्याच मारहाणीला कंटाळून पत्नी आणि मुलीने गळफास लावून घेवून दि. 6 रोजी रात्री आत्महत्या केली. त्या दोघींच्या आत्महत्याप्रकरणी गणेश मुंढे याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, गेल्या पंधरा वर्षापूर्वी गणेश याचा विवाह सविता हिच्यासोबत झाला होता. गणेश हा साताऱ्यातल्या एमआयडीसीतल्या एका कंपनीत कामास असल्याने लग्नानंतर ते साताऱ्यात एमआयडीसी परिसरातल्या कारंडवाडी येथील एका कॉलनीत रहात होते. त्यांना एक मुलगी जिविका ही होती. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सविताला मारहाण करायचा, त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी सविता हिने व तिची मुलगी जिविका (वय 13) या दोघींनी फॅनला दि. 6 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास गळफास लावून घेवून आत्महत्या केली. अगोदर याची खबर गणेशचे वडील ज्ञानेश्वर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. याची माहिती सविताच्या वडिलांना व नातेवाईकांना कळताच त्यांनी गणेश याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास सातारा तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय नेवसे हे करत आहेत.