For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

20 वर्षांपासून फरार असलेल्या मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला अटक

06:06 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
20 वर्षांपासून फरार असलेल्या  मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला अटक
Advertisement

केरळ पोलिसांची कारवाई : हत्तीच्या हल्ल्यामुळे जखमी अवस्थेत आढळला

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

मागील 20 वर्षांपासून नक्षली कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे. सुरेश उर्फ प्रदीप असे त्याचे नाव असून तो मुळचा चिक्कमंगळूर जिल्ह्याच्या मुडिगेरे तालुक्यातील अंगडी गावचा रहिवासी आहे. 2003 मध्ये नक्षली कारवायांमध्ये सहभागी असलेला सुरेश फरार होता. त्याला पकडून देणाऱ्याला 5 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती.

Advertisement

नक्षली कारवायांप्रकरणी सुरेश कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ पोलिसांना हवा होता. मात्र, मागील 20 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत तो चिक्कमंगळूर-कण्णूर सीमेवरील वनभागात लपून बसला होता. हत्तीने केलेल्या हल्ल्यामुळे तो गजाआड झाला आहे. केरळच्या कण्णूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नक्षलवादी सुरेश याचे मूळ नाव प्रदीप. नक्षली कारवायांमध्ये सामील झाल्यानंतर त्याने सुरेश हे नाव धारण केले. कर्नाटकात त्याच्याविरुद्ध 26 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी आपल्या नक्षली टीमसोबत केरळच्या कंचिकोल्ली येथे वनभागात जात असताना त्यांच्यावर हत्तीने हल्ला केला. यात सुरेशच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर सुरेशला तेथेच सोडून त्याच्या साथीदारांना पळ काढला. जखमी अवस्थेत सुरेश तेथेच होता. त्याला आदीवासी लोकांनी प्रथमोपचार करून कण्णूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, चौकशीवेळी पोलिसांना तो नक्षलवादी असल्याचे समजल्यानंतर अटक करण्यात आली.

Advertisement
Tags :

.