मोस्ट वॉन्टेड गँगस्टर गोल्डी ढिल्लन अटकेत
स्पेनमध्ये कारवाई : भारतात आणण्याची तयारी : लॉरेन्स बिश्नोईचा एकेकाळचा निकटवर्तीय साथीदार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, माद्रिद
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर गोल्डी ढिल्लन उर्फ गुरप्रीत सिंग याला स्पेनमध्ये अटक करण्यात आली आहे. पंजाब अँटी-गँगस्टर टास्क फोर्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्पॅनिश सुरक्षा यंत्रणांनी त्याला अटक केली आहे. गँगस्टर गोल्डी ढिल्लनवर चंदीगडच्या सेक्टर 11 मधील श्री कुमार मेडिकल हॉलच्या कॅशियर जानकी दास यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. आता त्याला भारतात आणण्याची तयारी केली जात आहे.
भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोल्डी ढिल्लन याला स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये अटक करण्यात आली आहे. पंजाबमधील पतियाळा जिह्यातील राजपुरा येथील रहिवासी असलेला गोल्डी ढिल्लन बऱ्याच काळापासून परदेशात लपून बसला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि अवैध शस्त्रs यांसारख्या अनेक गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तो ‘मोस्ट वॉन्टेड’ होता.
लॉरेन्ससोबत मैत्री, नंतर शत्रू बनला
ढिल्लन पूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या जवळचा होता, परंतु नंतर त्यांचे संबंध बिघडले आणि तो कथितरित्या बिश्नोई नेटवर्कचा विरोधक बनला. सुरक्षा यंत्रणांच्या मते, तो कॅनडा आणि युरोपमध्ये कार्यरत असलेल्या टोळ्यांच्या माध्यमातून खंडणी आणि लक्ष्यित हत्यांच्या गटांमध्ये सामील होता. पोलिसांच्या नोंदीनुसार, ढिल्लनवर चंदीगड आणि पंजाबमधील अनेक गुह्यांचा आरोप असून त्यात 2024 मधील चंदीगड सेक्टर-5 मध्ये झालेला गोळीबार आणि 13 जून रोजी सेक्टर-11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरच्या हत्येचा समावेश आहे.
अहवालांनुसार, तो जर्मनीमार्गे कॅनडात आला होता आणि तेथूनच आपली टोळी चालवत होता. त्याने कॅनडातील काही गोळीबारांची आणि एका व्यावसायिकाच्या हत्येची जबाबदारीही स्वीकारल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणा त्याच्या काही खलिस्तानी संघटनांशी असलेल्या संबंधांचीही चौकशी करत आहेत. गेल्यावर्षी कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवरील गोळीबारातही त्याचे नाव समोर आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.