सर्वाधिक नैसर्गिक प्रसुती होतात 'सीपीआर' मध्ये
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय सर्वोपचर रूग्णालयातील (सीपीआर) प्रसुती विभागात वर्षाकाठी सुमारे 10 हजार गर्भवतींची मोफत प्रसुती व शस्त्रक्रिया होत आहे. ग्रामीण, दुर्गम, वाड्यावस्त्या आणि दारिद्ररेषेखालील कुटुंबाना सीपीआरचा प्रसुती विभाग नवसंजीवनी ठरत आहे.
प्रसुतीगृहातून नॉर्मल, सिझेरियन प्रसुतीसह अत्यंत गुंतागुंतीच्या प्रसुती व शस्त्रक्रिया होत आहेत. यामध्ये सिझेरियनचे प्रमाण अत्यंत कमी आहे. येथील 24 तास सुरू असलेला प्रसुती विभाग हजारो कुटूंबांच्या जीवनात हास्य फुलवत आहे. सीपीआरमध्ये रोज किमान 30 गर्भवतींची प्रसुती होते. यामध्ये 15 ते 20 नैसर्गिक, नॉर्मल तर 5 ते 10 सिझेरियन प्रसुती होतात. महिन्याकाठी सुमारे 800 ते 900 गर्भवतींची प्रसुती होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जननी सुरक्षा योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, शासकीय कुटुंब कल्याण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने सर्व उपचार मोफत आहेत. हा विभाग हजारो महिलांना वरदान ठरला आहे. सिझरच्या अनेक केसेस नॉर्मल करण्यात सीपीआरचे डॉक्टर यशस्वी ठरले आहेत.
बऱ्याचदा जिल्हा परिषदेची 72 प्राथमिक आरोग्य केंद्र व 16 ग्रामीण रुग्णालये आणि चार उपजिल्हा रुग्णालयांतून नॉर्मल डिलिव्हरी, सिझर किंवा गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाल्यास येथील डॉक्टरांकडून सीपीआरला जाण्याचा सल्ला दिला जातो. शहरातील महापालिकेचे सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा रूग्णालय बंद किंवा फूल्ल झाले तर तेथील गर्भवतींनाही प्रसुतीसाठी सीपीआरमध्येच पाठवले जाते. जिल्ह्यासह शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये एखाद्यावेळी गर्भवतीची नाजूक स्थिती निर्माण झाल्यास नातेवाईकांना सीपीआरला नेण्याचा सल्ला दिला जातो. त्यातच परराज्यातील, सीमा भागातील अनेक गर्भवती सीपीआरलाच पसंती देत असल्यामुळे सीपीआरवर अधिक भार पडत आहे.
सध्या, 108 रुग्णवाहिकांची व्यवस्था झाल्याने रुग्णांचा सीपीआरकडे ओघ वाढत आहे. प्रसुती विभागातून अनेक गंभीर माता, नवजात बालकांना जीवनदान दिले गेले आहे. सीझरच होणार, अशी भीती घातलेल्यांच्या मातांची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात विभाग यशस्वी ठरत आहे. विभागातील डॉक्टर, नर्सेस आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून प्रामाणिकपणे सेवा बजावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- सर्व उपचार मोफत
अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा सिझर करण्याकडे कल वाढला आहे. यासाठी 20 ते 30 हजारांचे तर नॉर्मल डिलीव्हरीसाठीही 10 ते 15 हजाराचे पॅकेज दिले जाते. सीपीआरमध्ये मात्र, केवळ गरज भासल्यास सिझेरियन केले जाते. यासाठी सर्व उपचार मोफत केले जातात.
- ग्रामीण भागातील गर्भवतींना वरदान
ग्रामीण भागातील गर्भवतींना खासगी रुग्णालयांत नॉर्मल किंवा सिझेरियनसाठी सुमारे 10 ते 30 हजारांचा खर्च सांगितला जातो. दुर्गम, वाड्या, वस्त्यातील कुटुबांची आर्थिक स्थिती बेताची असते. अशावेळी सीपीआरचा प्रसुती विभाग त्यांना वरदान ठरत आहे.
- प्रसूती विभाग
एकूण डॉक्टर : 11
निवासी डॉक्टर : 15
एकूण बेड संख्या : 100
एकूण नर्सेस : 12
ऑपरेशन विभाग : 1
वॉर्ड : 4
रोज होणाऱ्या प्रसुती : 25 ते 30
नॉर्मल प्रसुती : 15 ते 20
सिझेरियन प्रसुती : 10 ते 15
- उपलब्ध योजना
जननी सुरक्षा योजना
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना
शासकीय कुटूंब कल्याण योजना
- 24 तास विभाग सुरू
प्रसुतीपूर्व व प्रसुती पश्चात सर्व उपचार मोफत होत असल्याने गरजूंना लाभ होत आहे. डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार उपलब्ध असल्याने हा विभाग 24 तास सुरू असतो. रूग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्वच डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून प्राधान्य दिले जाते.
डॉ. भास्कर मूर्ती, प्रसुती विभाग प्रमुख, सीपीआर