सुनिल छेत्रीचे सर्वाधिक गोल
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय फुटबॉल क्षेत्रातील जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू तसेच माजी कर्णधार सुनील छेत्रीने इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक गोल नोंदविले आहेत.
भारतातील इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा ही टॉप टीयर दर्जाची म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत सुनील छेत्रीने सर्वाधिक म्हणजे 64 गोल नोंदविले आहेत. सुनील छेत्रीने यापूर्वी या स्पर्धेत ओगबेचीच्या 63 गोलांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. आयएसएल स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेंगळूर एफसी संघाने विद्यमान विजेत्या मोहन बागानचा 3-0 अशा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात सुनील छेत्रीने पेनल्टीवर आपला 64 वा गोल नोंदविला. 40 वर्षीय सुनील छेत्रीने या स्पर्धेत यापूर्वी मुंबई सीटी एफसी संघाकडून 7 वेळा गोल नोंदविले होते. 2015 आणि 2016 साली सुनील छेत्री मुंबई सिटी एफसी संघाकडून खेळत होता. गेल्या जूनमध्ये सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. तसेच त्याने क्लब स्तरीय फुटबॉल स्पर्धेत यापुढेही खेळणार असल्याचे सांगितले होते.