फ्रान्ससमोर आज मोरोक्कोचे कडवे आव्हान
वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : फ्रान्सच्या विश्वचषक मोहिमेने त्यांच्या आक्रमकतेची, संयमाची आणि धैर्याची आधीच परीक्षा घेतली आहे, परंतु आजचा मोरोक्कोविऊद्धचा उपांत्यपूर्व सामना हा दिदिएर देशाँच्या संघासाठी वेगळे आव्हान ठरणार आहे: स्पर्धेतील ही यांची पहिली खरी परीक्षा राहणार असून हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 1.30 वा. सुरू होईल.
हा सामना 2022 च्या विश्वचषक उपांत्य फेरीची पुनरावृत्ती आहे. त्यात फ्रान्सने कतारमध्ये मोरोक्कोची ऐतिहासिक विजयी घोडदौड संपुष्टात आणली होती. परंतु यावेळी उत्तर आफ्रिकेचा हा संघ अनपेक्षितपणे स्पर्धेत दाखल झालेला संघ म्हणून नव्हे, तर एक आत्मविश्वासू आणि प्रतिभावान संघ म्हणून मैदानात उतरला आहे. त्यांनी ही स्पर्धा जिंकण्याची आपली महत्त्वाकांक्षा उघडपणे व्यक्त केली आहे.
पॅराग्वेवर 1-0 ने विजय मिळवून फ्रान्सने अंतिम आठ संघांच्या फेरीमध्ये प्रवेश केला. त्यात पॅराग्वेने बचावात्मक पवित्रा घेतला, खेळाची लय मंदावली आणि फ्रान्सला त्यांच्या बचावात्मक रचनेतून मार्ग काढताना बरीच शिकस्त करावी लागली. त्यात किलियन एम्बाप्पेने या विश्वचषकातील आपला सातवा गोल केला. परंतु या कामगिरीने हे देखील अधोरेखित केले की, ज्या संघाला स्पर्धेच्या बहुतांश काळात त्यांच्या आक्रमक प्रतिभेने तारले आहे त्या संघासमोर आता बाद फेरीचे सामने अधिक कठीण आव्हाने उभे करू लागले आहेत.
मोरोक्कोविऊद्धचे आव्हान वेगळे असेल. मोहम्मद ओउहबीच्या संघाने हे दाखवून दिले आहे की, ते प्रतिस्पर्ध्यांकडून होणारा त्रास सहन करू शकतात, चेंडूवर ताबा मिळवू शकतात आणि वेग व अचूकतेच्या बळावर त्यांना नामोहरम करू शकतात. गट फेरी अपराजित राहून पार केल्यानंतर 16 संघांच्या फेरीत कॅनडावर मिळवलेल्या त्यांच्या 3-0 या विजयाने याची पुष्टी केलेली आहे..