मोरोक्कोची पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सवर मात
नियमित व अतिरिक्त वेळेतील 1-1 बरोबरीनंतर 3-2 ने विजय,
वृत्तसंस्था, ग्वादालुपे, मेक्सिको : इस्माईल सायबारीने पेनल्टी शूटआऊटमध्ये निर्णायक गोल केला आणि सोमवारी रात्री 1-1 अशा बरोबरीनंतर मोरोक्कोने नेदरलँड्सला 3-2 ने हरवून विश्वचषकातून लवकर बाहेर रवाना करताना एका धक्कादायक निकालाची नोंद केली.
चार फेऱ्यांनंतर शूटआऊट 2-2 असे बरोबरीत असताना मोरोक्कोचा गोलरक्षक यासिन बोनूने क्रिसेन्सियो समरविलेचा प्रयत्न आपल्या डाव्या हाताने जोरदार पद्धतीने अडवला. त्यानंतर सायबारीने गोलरक्षक बार्ट वर्ब्रुगेन दुसऱ्या दिशेने जात असताना डाव्या कोपऱ्यात चेंडू हाणून विजयी गोल केला. त्यापूर्वी शूटआऊटमध्ये मोरोक्को 1-0 ने मागे असताना वर्ब्रुगेनने सौफियान रहिमीचा एक प्रयत्न अडवल्यासारखे वाटले होते, परंतु गोलरक्षकाला चेंडू नीट पकडता आला नाही आणि त्याच्या पायाच्या मागच्या बाजूला लागून तो गोल रेषेच्या पलीकडे गेला.
या सामन्यात बराच काळ मोरोक्कोचे वर्चस्व राहिले, तर नेदरलँड्सने प्रतिहल्ल्यांवर भर दिला. नेदरलँड्ससाठी कोडी गॅकपोने 72 व्या मिनिटाला गोल केला. समरविलेच्या पासवर हा गोल झाल्यानंतर डच संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक मैदानात धावत आले आणि त्यांनी 27 वर्षीय गॅकपोला मिठी मारली. यावेळी गॅकपो भावूक होऊन रडू लागला. गॅकपो आणि त्याची जोडीदार नोआ व्हॅन डर बिज यांनी नुकतेच त्यांचे बाळ गमावल्याचे जाहीर केले होते.
91 व्या मिनिटाला मोरोक्कोच्या इस्सा डिओपने गोल करून सामना बरोबरीत आणला. डाव्या बाजूला सुमारे 28 यार्ड अंतरावरून चेम्सदिन तालबीने ‘बॉक्स’मध्ये एक उंच ‘क्रॉस’ मारला, ज्यावर डिओपने अचूक हेडर लगावला. गोलरक्षक वब्रुगेनला तो रोखण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ‘एस्तादियो बीबीव्हीए’ येथे खेळल्या गेलेल्या 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत दोन्हीपैकी कोणत्याही संघाला गोल करण्याची ठोस संधी मिळाली नाही.
अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात नेदरलँड्सचे मुख्य प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांनी बदली खेळाडू म्हणून जस्टिन क्लुइव्हर्टला मैदानात उतरवले. पेनल्टी शूटआउटमध्ये गोल करण्यात अपयशी ठरलेल्या तीन डच खेळाडूंपैकी क्लुइव्हर्ट एक होता. कोमन म्हणाले की, मी जस्टिनला बदली खेळाडू म्हणून मैदानात आणले, कारण पेनल्टी शूटआउटमध्ये तो सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पण त्याची पेनल्टी हुकली आणि ही गोष्ट त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी अधिकच वेदनादायी ठरली.
नेदरलँड्स सलग तिसऱ्यांदा पेनल्टी शूटआऊटवर बाहेर
नेदरलँड्सने यापूर्वी 11 विश्वचषकांमध्ये किमान 16 संघांच्या फेरीपर्यंत मजल मारली होती. यात चार वर्षांपूर्वी कतारमध्ये खेळलेल्या उपांत्यपूर्व फेरीचाही समावेश होतो. सदर स्पर्धेत मोरोक्कोने ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली होती. पेनल्टी शूटआउटमध्ये नेदरलँड्स विश्वचषकातून बाहेर पडण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. तसेच या स्पर्धेतील शूटआउटने संपलेला हा दुसरा सामना आहे. आता मोरोक्कोचा सामना शनिवारी ह्युस्टन येथे सहयजमान कॅनडाविऊद्ध सोळा संघांच्या फेरीमध्ये होणार आहे. मोरोक्कोने याआधी 2022 च्या विश्वचषकाच्या गट फेरीत कॅनडाचा 2-1 असा पराभव केला होता.