आधार अद्ययावतीकरणासाठी अधिक कालावधी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आधार कार्डाचे अद्ययावतीकरण (अपडेटिंग) करण्यासाठीच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार आता 14 जूनपर्यंत ही प्रक्रिया केली जाऊ शकणार आहे. या वाढीव कालावधीत हे अद्ययावतीकरण विनामूल्य केले जाऊ शकणार आहे. त्यासाठी आधार कार्डाची कागदपत्रे मायआधार पोर्टलवर विनामूल्य अपलोड केली जाऊ शकणार आहेत, अशी माहिती देण्यात आली असून असंख्य आधार कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे.
ही विनामूल्य सेवा केवळ मायआधार पोर्टलवर उपलब्ध असेल. इतर आधार केंद्रावर या सेवेसाठी 50 रुपयांचे नेहमीचे शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्यांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड घेतले असेल आणि त्यानंतर ते एकदाही अपडेट केले नसेल त्यांनी ते लवकरात लवकर अपडेट करुन घ्यावे, यासाठी केंद्र सरकार जनजागृती करीत आहे. हे अद्ययावतीकरण केल्याने आधार आधारित सेवा आणि कल्याण योजनांचा लाभ उठविण्यासाठी अधिक सोय होणार आहे.
प्रक्रियेचीही घोषणा
आधारवरील आपले नाव, पत्ता, जन्मदिनांक इत्यादी माहिती अद्ययावत करायची असेल तर कोणती प्रक्रिया करावी लागेल, याची माहितीही केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. हे अद्ययावतीकरण दोन माध्यमांमधून केले जाऊ शकेल. प्रथम माध्यम मायआधार या पोर्टलचे आहे. तर दुसरे माध्यम स्थानिक आधार केंद्र हे आहे.
पोर्टलचा उपयोग कसा करावा
- प्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ या बेबसाईटला लॉगइन करा
- Document Update हा पर्याय निवडा आणि क्लिक करा. तुमची सध्याची माहिती तुम्हाला पडद्यावर दिसू लागेल.
- सध्याची माहिती पडताळून पहा. त्यानंतर पुढच्या हायपर लिंकवर क्लिक करा.
- ड्रॉपडाऊन लिस्टमधून ओळख प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ निवडा.
- स्कँड कॉपीज अपलोड करा आणि पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा.