इंडिगोची हजारहून अधिक विमाने जमिनीवरच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी ‘इंडिगो’ची सेवा अद्याप कोलमडलेलीच असल्याने अनेक प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. वैमानिकांसाठी नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन नियम लागू करण्यात इंडिगोला मोठ्या अडचणी येत असल्याने विमानसेवेवर परिणाम झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाली असतानाच शुक्रवारी हे संकट अधिकच तीव्र झाले होते. शुक्रवारी दिवसभरात 1000 हून अधिक इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती कंपनीच्या सीईओंनी एका निवेदनाद्वारे दिली. तसेच आता ही सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी पुढील आठ ते दहा दिवस लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता केंद्र सरकारने इंडिगोला नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन नियमांपासून दिलासा दिल्यामुळे कंपनी सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी सक्रीय झाली आहे.
इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात कंपनीची बाजू मांडली. गेल्या काही दिवसांपासून एअरलाइनला ऑपरेशनल अडचणी येत आहेत. 5 डिसेंबर रोजी कंपनीच्या कामकाजावर सर्वाधिक परिणाम झाला. शुक्रवारी हजारहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. रद्द झालेल्या सर्वाधिक उड्डाणांची संख्या सिस्टम रीबूटमुळे आहे. इंडिगोचे संपूर्ण कामकाज 10 ते 15 डिसेंबर दरम्यान पूर्णपणे पूर्ववत होईल. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे सीईओंनी म्हटले आहे. तसेच प्रवाशांना नवीनतम अपडेटसाठी त्यांच्या फ्लाइट स्थितीचे निरीक्षण करण्याची विनंतीही त्यांनी केली.
4 दिवसांत दोन हजारहून अधिक उड्डाणे रद्द
सरकारने वैमानिक आणि इतर क्रू सदस्यांना दर सात दिवसांनी सलग 48 तास आठवड्याची विश्रांती देण्याचे बंधनकारक करणारा आपला आदेश तात्काळ मागे घेतला आहे. ‘डीजीसीए’च्या नवीन नियमांमुळे शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी इंडिगोला क्रूच्या कमतरतेचा सामना करावा लागल्यामुळे दोन हजारहून अधिक विमानफेऱ्या रद्द झाल्या. दिल्ली, बेंगळूर, पुणे आणि हैदराबादसह अनेक विमानतळांवर बरीच उड्डाणे रद्द करण्यात आली. गुरुवारी एका दिवसात दिल्ली आणि मुंबईसह 10 हून अधिक विमानतळांवर 550 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
प्रवाशांचा संताप अनावर
प्रवाशांच्या विमानतळांवरील गर्दीमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रवासी 24 तासांपर्यंत विमानांची वाट पाहत आहेत. त्यांना उड्डाणाची माहिती मिळू शकत नाही. दिल्ली विमानतळावर, पाणी, अन्न आणि आवश्यक वस्तूंसाठी प्रवासी कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालताना आणि भांडताना दिसले. काही प्रकरणांमध्ये मारामारीही झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी इंडिगो प्रशासनाने प्रवाशांची माफी मागत लवकरच ऑपरेशन्स पूर्ववत करण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले.